न्यायालयाचा आदेश डावलून जरेंडेश्‍वरला 280 कोटींचे कर्ज : डॉ. शालिनीताई पाटील

जरंडेश्‍वर साखर कारखान्याबरोबरच अन्य कारखान्यांच्या विक्रीत झालेल्या कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोरेगावात दोन वेळा येऊन चौकशी केली आहे. -डॉ. शालिनीताई पाटील
Shalinitai-Patil
Shalinitai-Patil

कोरेगाव (जि. सातारा) : साखर आयुक्तांनी दाखल केलेल्या खटल्यात न्यायालयाने 'जैसे थे' आदेश दिलेला असतानाही सातारा, पुणे आणि सिंधूदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी जरंडेश्‍वर शुगर मिलला सुमारे 280 कोटींचे कर्ज दिल्याचा दावा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी केला आहे. यासंदर्भात आम्ही अंमलबजावणी संचलनालयाकडे स्वतंत्र तक्रार दाखल करणार आहोत, अशी माहिती श्रीमती पाटील यांनी कोरेगावात पत्रकार परिषदेत दिली.

जरंडेश्वर कारखान्याचे शासकीय प्रमाणित मुल्यांकन 102 कोटींहून अधिक होत असताना केवळ 18 कोटींना हा कारखाना कसा विकला, असा प्रश्न उपस्थित करून डॉ. पाटील म्हणाल्या, "मुंबई येथील गुरु कमोडिटीज कंपनीने राज्य सहकारी बॅंकेकडून जरंडेश्वर कारखाना लिलावात विकत घेतला. मग बॅंकेने कारखान्याचा ताबा पुण्याच्या बीव्हीजी कंपनीकडे कसा दिला. एक वर्षे बीव्हीजी कंपनीने कारखाना चालविला आणि तो आता जरंडेश्‍वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखला जात आहे. एकंदरीतच ही प्रक्रिया कायद्याला अनुसरुन नाही.''


' केवळ 18 कोटी रुपयांना विकलेल्या या कारखान्यावर आता 280 कोटींहून अधिक कर्ज आहे. कारखान्याच्या मालमत्तेची किंमत अथवा मुल्यांकन जर 500 कोटींचे आहे, तर हा कारखाना इतक्‍या कवडीमोल किंमतीने का विकला ?  सातारा जिल्हा बॅंकेने 134 कोटी, पुणे जिल्हा बॅंकेने 159 कोटी, तर सिंधूदुर्ग जिल्हा बॅंकेने 36 कोटींचे कर्ज या कारखान्याला दिले आहे. तशी नोंद कारखान्याच्या चिमणगाव येथील गट क्रमांक 803 च्या सात-बारा उताऱ्यावर असल्याचा दावा डॉ. पाटील यांनी यावेळी केला.


आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी?
जरंडेश्‍वर साखर कारखान्याबरोबरच अन्य कारखान्यांच्या विक्रीत झालेल्या कोट्यवधींच्या कथित घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोरेगावात दोन वेळा येऊन चौकशी केली आहे. गेल्या 16 ऑक्‍टोबरला तक्रार दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 17 ऑक्‍टोबरला आणि त्यानंतर 18 डिसेंबरला आर्थिक गुन्हे शाखेचे पथक कोरेगावात आले होते. त्यांनी कारखान्याबाबत सखोल माहिती घेतली असल्याचे डॉ. पाटील यांनी यावेळी सांगितले.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com