जरंडेश्वर कारखान्यासाठी ईडीकडे तक्रार : डॉ. शालिनीताई पाटील - shalinitai filed complaint to ed for jarandeshwar mill | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

जरंडेश्वर कारखान्यासाठी ईडीकडे तक्रार : डॉ. शालिनीताई पाटील

उमेश भांबरे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

....

कोरेगाव : जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात गेल्या १६ आॅक्टोबरला मी स्वत: ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. हा कारखाना परत मिळवून पुन्हा सभासदांच्या ताब्यात द्यायचा असून, त्यासाठीचा माझ्या आयुष्यातील हा शेवटचा संघर्ष असल्याचे माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी सांगितले.

शिवसेनेने मतभेद व भांडणाचे प्रदर्शन करून राज्यात सत्ता स्थापनेचा विषय चेष्टेचा केला आहे. जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिल्याचे आधी सांगणारे आता सत्तेच्या पांघरुणासाठी सरकारमध्ये निघालेत, असा आरोप श्रीमती पाटील यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीवर केला आहे.

राज्य सहकारी बँकेचा कथित घोटाळा बाहेर काढणारे व ईडीमार्फत कारवाई करण्यास भाग पाडणारे सहकार चळवळीचे अभ्यासक माजी आमदार माणिकराव जाधव व याबाबतच्या बँकेच्या खटल्यामध्ये भूमिका बजावणारे अॅड. सतीश तळेकर यांचा जाहीर सत्कार व शेतकरी परीषदेचे आयोजन येत्या रविवारी (ता. २४) दुपारी एक वाजता कोरेगाव येथे आयोजित केला आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले व नवनिर्वाचित आमदार महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत श्रीमती पाटील बोलत होत्या.

शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आणल्याचा आणि अजित पवार यांनी सत्तेच्या जोरावर राज्य बँक ताब्यात घेऊन साखर कारखाने बळकवल्याचा आरोप करून श्रीमती पाटील म्हणाल्या, "कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तीन पिढ्यांपासून कॉंग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याशी प्रामाणिक असलेले तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कठोर पावले उचलून राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. आता मात्र श्री. चव्हाण हे देखील श्री. पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे राज्यात महाआघाडीचे सरकार बनवायला निघाले आहेत, याचे कोडे अजून उलगडले नाही. कॉंग्रेसने गेल्या ७० वर्षांत देशाला भेडसावणारे प्रश्न केवळ मूठभर लोकांसाठी आणि मतांच्या राजकारणासाठी सोडवले नाहीत; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरमधील घटनेचे ३७० कलम हटवण्याचे महत्वपूर्ण काम केले. त्यांचे वलय आणि कामाच्या झपाट्यामुळेच महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-मित्रपक्षाच्या महायुतीला यश मिळाले. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतलेली भूमिका अयोग्य व बेजबाबदारपणाची वाटते. एक महिना उलटत आला तरी सरकार स्थापन न होणे, ही बाब राज्याच्या विकासामध्ये अडथळा ठरणारी आहे." मी

आजही कॉंग्रेसमध्येच आहे, मला मतस्वातंत्र्य आहे, ते काही कॉंग्रेसने काढून घेतलेले नाही, आता मला कोणत्या निवडणुकीचे तिकीट नको आहे, त्यामुळे मला अन्य पक्षामध्ये जाण्याची आवश्यकता नाही, असेही श्रीमती पाटील यांनी स्पष्ट केले.

मागील आमदारांचा कारभार आम्हाला पसंत नव्हता, असे नमूद करून श्रीमती पाटील म्हणाल्या, "नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या कारखाना गटाने शिवसेनेला नव्हे, तर महायुतीला पाठिंबा दिला होता. पाठिंब्याच्या पत्रकावर केवळ नरेंद्र मोदी व त्यांच्या कामाचा उल्लेख होता. शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांचा उल्लेख नव्हता. आता महेश शिंदे आमदार झाले आहेत. ते माझे नातेवाईक म्हणजे नात्याने नातू आहेत. ते मला भेटायला आले होते. मला आजी म्हणत त्यांनी माझा पदस्पर्श केला. मात्र, सद्यस्थितित त्यांचा पक्ष वाटेल त्या तडजोडी करायला लागला असेल, तर त्यांनी विचार करावा. त्यांनी कसे वागावे हा त्यांचा प्रश्न आहे. राज्यात सरकार कोणाचेही येवो, त्यांनी जरंडेश्वर कारखान्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा आहे."

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख