Seven BJP Aspirants Want Ticket in Dada Bhuse's Constituency | Sarkarnama

राज्यमंत्री दादा भुसे निश्‍चित; तरीही भाजपच्या सात इच्छुकांना उमेदवारीची आशा!

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येत्या एक-दोन दिवसांत युतीची घोषणा करतील. राज्यमंत्री दादा भुसे यांनी आपण युतीचे उमेदवार आहोत अशी सगळ्या इच्छुकांची समजुत घातली आहे. तरीही ऐनवेळी युती तुटेल आणि आपल्याला दादा भुसे यांच्या विरोधात उमेदवारी मिळेल असे सात भाजप इच्छुकांना वाटते. हे सातही जण मतदारसंघात दारोदार संपर्कात व्यग्र असल्याचे चित्र मालेगाव बाह्य मतदारसंघात आहे.

मालेगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे येत्या एक-दोन दिवसांत युतीची घोषणा करतील. राज्यमंत्री दादा भुसे यांनी आपण युतीचे उमेदवार आहोत अशी सगळ्या इच्छुकांची समजुत घातली आहे. तरीही ऐनवेळी युती तुटेल आणि आपल्याला दादा भुसे यांच्या विरोधात उमेदवारी मिळेल असे सात भाजप इच्छुकांना वाटते. हे सातही जण मतदारसंघात दारोदार संपर्कात व्यग्र असल्याचे चित्र मालेगाव बाह्य मतदारसंघात आहे.

शिवसेना- भाजप युतीबाबत सर्वच नेते सातत्याने 'आमच ठरलय...' असे सांगत आहेत. मात्र, तरीही मोठ्या अपेक्षा ठेऊन भारतीय जनता पक्षात गेलेले नेते आहेत. दुसरे पक्षातील जुन्या नेत्यांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. कोणीही उमेदवारी आणा अन्‌ विजयी व्हा, असे चित्र असल्याचा समज आणि गैरसमज या नेत्यांत आहे. त्यामुळे भाजपकडे सात इच्छुकांनी मुलाखत देऊन उमेदवारी मागीतली आहे. यामध्ये भाजपचे महापालिकेतील गटनेते सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, ज्येष्ठ नेते सुरेश निकम, जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे, तालुका प्रमुख निलेश कचवे, जिल्हा सरचिटणीस दीपक पवार, बांधकाम सभापती मनिषा पवार या सात इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. 

यामध्ये सभापती मनिषा पवार आणि रत्नाकर पवार यांचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चांगला संपर्क आहे. या जोरावर त्यांनी नांदगाव आणि मालेगाव बाह्य या दोन्ही मतदारंसघात उमेदवारी मागितली आहे. त्या प्रमुख उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार मानल्या जातात. या सातही जणांशी शिवसेनेचे विद्यमान आमदार राज्यमंत्री दादा भुसे यांनी स्वतः संपर्क करुन आपण युतीचेच उमेदवार आहोत असे स्पष्ट केले आहे. मात्र कोणीही त्यावर विश्‍वास ठेवायला तयार नाही. 

हे सातही इच्छुक अद्यापही युती होणार नाही. भाजपची राज्यात स्वबळावर सत्ता येईल. आपल्याला उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. ही आशा ते मतदारांना कानात सांगतात. युती झाल्यावर हे इच्छुक नाराजीच्या 'मोड' मध्ये गेल्यास त्याचा विरोधकांच्या पथ्थ्यावर पडेल ही भिती आहे.

एकेकाळी हिरे घराण्याचा बालेकिल्ला असलेला हा हायप्रोफाईल मतदारसंघ आहे. ही मक्तेदारी मोडून काढत शिवसेनेचे दादा भुसे येथून सलग तिसऱ्यांदा विजय संपादन केला आहे. सध्या ते विद्यमान राज्यमंत्री आहेत. ते मोठ्या आत्मविश्‍वासाने चौथ्यांदा मतदारांना सामोरे जात आहेत. त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. मेळावे व बैठकांच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क सुरू आहे. मात्र त्यांच्या मार्गात भाजपच्या इच्छुकांचाच अडसर आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख