फुटीर नेत्यांची मुले विदेशांत सुखात! गृहमंत्रालयाने जारी केलेल्या यादीतील माहिती

'काश्‍मीर खोऱ्यातील शाळा दहशतीखाली बंद पाडून स्वतःची पोरेबाळे मात्र शिकायला विदेशांत पाठविण्याचे प्रकार करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांना वेसण घालू,' या गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दिलेल्या इशाऱ्यापाठोपाठ त्यांच्या मंत्रालयाने अशा शेकडो नेत्यांची कुंडलीच मांडली आहे.
फुटीर नेत्यांची मुले विदेशांत सुखात! गृहमंत्रालयाने जारी केलेल्या यादीतील माहिती

नवी दिल्ली : 'काश्‍मीर खोऱ्यातील शाळा दहशतीखाली बंद पाडून स्वतःची पोरेबाळे मात्र शिकायला विदेशांत पाठविण्याचे प्रकार करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांना वेसण घालू,' या गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दिलेल्या इशाऱ्यापाठोपाठ त्यांच्या मंत्रालयाने अशा शेकडो नेत्यांची कुंडलीच मांडली आहे. काश्‍मीर खोऱ्यात पाकिस्तानच्या पाठिंब्याने फुटीरतावादी कारवायांना सक्रिय बळ देणाऱ्या अशा 112 नेत्यांची किमान 220 मुले विदेशांत शिक्षण घेऊन तिकडेच स्थायिक झाल्याचे या निवेदनावरून स्पष्ट होते.

काश्‍मीरबाबतच्या विधेयक मंजुरीवेळी बोलताना शहांनी सांगितले होते, की मोदी सरकारही 'काश्‍मिरियत- इन्सानियत- जम्हुरियत'च्याच मार्गाने काश्‍मीरचा तिढा सोडविण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र याचा अर्थ येथील शाळा दहशतीने बंद पाडून व काश्‍मिरी तरुणांच्या हाती दगड देऊन स्थानिक विद्यार्थ्यांचे आयुष्य खराब करणे व आपल्या स्वतःच्या मुलांना मात्र विदेशात पाठवून उच्चशिक्षण देणे असा होत नाही व अशा फुटीरांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळेल असे शहा म्हणाले होते. या फुटीरतावादी काश्‍मिरी नेत्यांचा खरा चेहरा उघड करण्याच्या टप्प्यात गृहमंत्रालयाने त्यांची यादीच प्रसिद्ध केली आहे.

शहा यांनी सुरू केलेल्या या मोहिमेला 'पोल खोल अभियान' असे भाजप वर्तुळात म्हटले जाते. संसदेत शहा यांनी काश्‍मीर खोऱ्यातील 130 हुरियत नेत्यांची कुंडली मांडली तरी ताज्या यादीत इतर फुटीरतावादी संघटनांच्या नेत्यांचा व त्यांच्या मुलाबाळांचाही लेखाजोखा मांडलेला दिसतो. यातील अनेक नेत्यांवर काश्‍मिरी तरुणांना लष्कर व पोलिसांवर दगडफेकीसाठी प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोप आहेत.

काही महत्त्वाचे नेते असे
- एस. ए. एस. गिलानी : यांचा मुलगा नईम याने पाकिस्तानातून एमबीबीएसची पदवी घेतली असून, तो रावळपिंडीत वैद्यकीय व्यवसाय करतो. गिलानी यांची मुलगी सौदी अरेबियात शिक्षिका असून, जावई अभियंता आहे. त्यांची एक नात तुर्कस्तानात पत्रकार आहे, तर दुसरी नात पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे. गिलानींच्या दुसऱ्या जावयाचा मुलगाही सौदी अरेबियात आहे.
- मीरवाइज उमर फारूक : यांची बहीण रुबिया या अमेरिकेत डॉक्‍टर आहे.
- असिया अंद्राबी : 'दुख्तरने मिल्लत' या संघटनेची प्रमुख असलेल्या व सध्या तुरुंगात असलेल्या असियाचा एक मुलगा मलेशियात शिकतोय आणि दुसरा ऑस्ट्रेलियात असतो. असियाची बहीण मरियमही मलेशियात असते.
- असरफ सेहरई : "हुरियत'च्या गिलानी गटाचे सरचिटणीस असलेल्या असरफ सेहरई यांची खालिद आणि आबिद असरफ ही दोन्ही मुले सौदी अरेबियात नोकरी करतात.
- मोहम्मद शफी रेशी : यांचा मुलगा अमेरिकेत पीएच.डी. करत आहे.
- अशरफ लाया : यांची मुलगी पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
- बिलाल लोन : यांची एक मुलगी आणि जावई लंडनमध्ये स्थायिक झाले असून, लहान मुलगी ऑस्ट्रेलियात शिकत आहे.
- मोहम्मद युसूफ मीर : यांची मुलगी पाकिस्तानात वैद्यकीय शिक्षण घेत आहे.
- गुलाम मोहम्मद बट्ट : यांचा एक मुलगा सौदी अरेबियात डॉक्‍टर आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com