sensitive tehsildar and non sensetive doctor | Sarkarnama

संवेदनशील तहसीलदार आणि संवेदनाशून्य डॉक्टर! 

ज्ञानेश्वर रायते
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

भवानीनगर : स्थळ : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेचा सरकारी दवाखाना. वेळ : संध्याकाळी सात. वादळी पावसात झाड अंगावर पडून दगावलेल्या दुचाकीस्वाराच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांसह काहीजण थांबलेले. त्या वेळी झालेला हा संवाद.

 
""हॅलो डॉक्टर, एक इमर्जन्सी आहे, तुम्ही लासुर्ण्यात तात्काळ पोहोचा..'' 
डॉक्टर- होय सर, लगेच पोचतो.. 
(पंधरा मिनिटानंतर) 
""डॉक्टर तुम्ही पोचलात का?'' 
डॉक्टर - होय, हे काय मी पोचलोच आहे. 

भवानीनगर : स्थळ : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषदेचा सरकारी दवाखाना. वेळ : संध्याकाळी सात. वादळी पावसात झाड अंगावर पडून दगावलेल्या दुचाकीस्वाराच्या शवविच्छेदनासाठी नातेवाईकांसह काहीजण थांबलेले. त्या वेळी झालेला हा संवाद.

 
""हॅलो डॉक्टर, एक इमर्जन्सी आहे, तुम्ही लासुर्ण्यात तात्काळ पोहोचा..'' 
डॉक्टर- होय सर, लगेच पोचतो.. 
(पंधरा मिनिटानंतर) 
""डॉक्टर तुम्ही पोचलात का?'' 
डॉक्टर - होय, हे काय मी पोचलोच आहे. 

असाच संवाद दोन-तीन वेळा होऊनही डॉक्टर सुमारे एक तासानंतर दवाखान्यात पोहचतात. मात्र, फोन करणाऱ्या "नागरिकाला' पाहून त्यांच्या पायाखालची वाळूच सरकते. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी वारंवार फोन करूनही डॉक्‍टरांनी त्यांना "सर्वसामान्यांना' दिली जाणारी वागणूक काय आहे, हेच प्रत्यक्ष दाखवून दिले. माणुसकीची संवेदना किती बोथट झालीय याची साक्ष देणारा हा क्षण होता. 

17 एप्रिल रोजी वादळी पावसात इंदापूर तालुक्यात शेळगाव नजीक 54 फाटा येथे झाड अंगावर पडून थोरातवाडी येथील अमर बबन थोरात या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच श्रीकांत पाटील घटनास्थळी पोचले. ते मृताच्या नातेवाईकांसमवेत लासुर्णे येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रात पोचले. तेथे शवविच्छेदन होऊन नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह सोपवायचा होता. डॉक्टर मात्र दवाखान्यात हजर नव्हते. ते बाहेर असल्याने स्थानिकांनी त्यांना फोनवरून कल्पना दिली. त्यांनी पंधरा मिनिटांत पोचतो अशी माहिती दिली. ते येताहेत म्हटल्यावर तहसीलदारही निर्धास्त झाले. अर्धा तास झाला तरी ते येईनात, म्हणून तहसीलदारांनी त्यांना लासुर्ण्यात लवकर पोहोचा असा निरोप दिला.

 
डॉक्टरांना तहसीलदार इंदापूरातून सूचना करीत असावेत असे वाटल्याने त्यावर हे काय, पोचलोच असे सांगत नंतरही वेळोवेळी वरीलप्रमाणे संवाद होत राहिला. प्रत्यक्षात डॉक्टर काही पोचलेच नव्हते. तब्बल एक ते सव्वा तासानंतर डॉक्‍टर तेथे पोचले. तेव्हा समोर तहसीलदारच उभे होते. पाटील यांनी अगोदर डॉक्टरांना तातडीने शवविच्छेदन करण्याच्या सूचना केल्या. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार 

तहसीलदारांनाच कात्रजचा घाट दाखवायला निघालेल्या संबंधित डॉक्टरांच्या कर्तृत्वाची माहिती तहसीलदारांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने व आरोग्य सभापती प्रवीण माने यांच्या कानावर घातली. आरोग्य खात्याचे कर्मचारी सामान्यांशी कसे वागतात याच्या तक्रारी आतापर्यंत सामान्य नागरिक करीत होते, खुद्द तहसीलदारच अशा घटनेचे साक्षीदार बनल्याने या खात्यातील "माणुसकीशून्य' भावनेचे प्रश्नचिन्ह अधिकच अधोरेखित झाले. मात्र, एकाच वेळी सरकारी खात्यातील दोन अधिकाऱ्यांची परस्परविरोधी कार्यपद्धतही प्रत्यक्षदर्शींनी अनुभवली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख