Senior Officers in Mantralaya Trying to Capture CM
Senior Officers in Mantralaya Trying to Capture CM

जेष्ठ सनदी अधिका-यांचा मुख्यमंत्र्यांवर ताबा?

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यामुळे मंत्रालयासह राज्यातील महत्वाच्या पदांवरील अधिका-यांच्या बदल्या अपेक्षित आहेत. मात्र या अधिका-यांनी ठाकरे यांचा संपूर्ण ताबा घेतल्याने बदल्या रखडल्याचे समजते.

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात महत्वाची पदे उपभोगल्यावर सुमारे डझनभर जेष्ठ आयएएस अधिका-यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुन्हा पूर्ण ताबा घेतला आहे. अन्य कोणी अधिकारी ठाकरे यांना भेटण्यासाठी येणार असेल तर त्यापूर्वीच यातील एक अतिवरीष्ठ अधिकारी मुख्यमंत्रयांच्या दालनात जावून काही विषयावरील चर्चा करत वेळ मारून नेत असल्याने भेटावयास गेलेला आधिकारी हात हालवत माघारी फिरत असल्याची माहिती जेष्ठ 'आयएएस' अधिका-याने दिली.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोणताही मुख्यमंत्री आपल्या मर्जीतील 'आयएएस' अधिक-यांची महत्वाच्या पदांवर वर्णी लावत असल्याची परंपरा आहे. राज्याचा गाडा आपल्या ईच्छेनुसार आणि तांत्रिक बाबींच्या माहितीच्या आधारे हाकता यावा अशी मुख्यमंत्र्याची अपेक्षा असते. याच धर्तीवर सन 2014 साली सत्तेवर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील अनेक अधिका-यांची महत्वाच्या पदांवर नियुक्‍ती केली. 

यात मुख्य सचिवांवापासून मुख्यमंत्री कार्यालयातील अपरमुख्य सचिव, प्रधान सचिव आणि मंत्रालयातील अन्य प्रधान सचिव, मुंबई आणि ठाणे महापालिका आयुक्‍त, नगरविकास विभाग-2, महसूल, वित्त विभाग, गृह, सामान्य प्रशासन, एमएमआरडीए, म्हाडा, गृहनिर्माण, राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई, मुंबई उपनगर तसेच पुणे, नाशिक, नागपूरसारख्या मोठया शहरांचे पालिका आयुक्‍त अशा नियुक्‍त्या फडणवीस यांनी केल्या होत्या. विशेष म्हणजे जी पदे 'आयएएस' अधिका-यांची आहेत, अशा पदांवरही फडणवीस यांनी आयपीएस आणि केंद्रीय महसूल सेवेतील अधिका-यांची वर्णी लावली आहे. 

आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. त्यामुळे मंत्रालयासह राज्यातील महत्वाच्या पदांवरील अधिका-यांच्या बदल्या अपेक्षित आहेत. मात्र या अधिका-यांनी ठाकरे यांचा संपूर्ण ताबा घेतल्याने बदल्या रखडल्याचे समजते.

"आधीचे मुख्यमंत्री आपणांस योग्य पोस्टींग देत नव्हते. मनासारखे काम करू देत नव्हते, काम करताना मुख्यमंत्री कार्यालयाचा अनावश्‍यक दबाव असायचा'', अशी कारणे सांगून हे अधिकारी उद्धव ठाकरे यांचा विश्‍वास संपादन करत आहेत. या अधिका-यांनी जोरदार 'लॉबिंग' केल्याने अन्य जेष्ठ अधिका-यांची मुख्यमंत्र्यांसोबतची भेट दुरापास्त झाल्याचे सांगण्यात आले. कार्यालयीन कामासाठी एखाद्या अपर मुख्य सचिव,प्रधान सचिव किंवा सचिव दर्जाच्या अधिका-याला मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावयाची असल्यास त्यांना मुख्यमंत्री कार्यालयाला कळवावे लागते. 

ही बाब अतीवरीष्ठ अधिका-याला समजण्याची व्यवस्था मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे अपॉईंटमेंट घेतलेल्या अधिका-याच्या वेळेआधी अतीवरीष्ठ अधिकारी मुख्यमंत्रयांकडे काही विषयांच्या फाईल घेवून चर्चा करत बसल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिका-यांवर चर्चा अर्धवट सोडून माघारी फिरावे लागत असल्याचे एका वरीष्ठ अधिका-याने सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com