Sena MP supports rebel in Manavat | Sarkarnama

मानवतच्या बंडाला खासदारांचा पाठिंबा !

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 मार्च 2017

आपल्यासोबत असे प्रकार होण्याची ही चौथी वेळ आहे. मी ज्या कार्यकर्त्याची शिफारस करतो, त्याला जाणीवपूर्वक डावलले जाते. मानवत पंचायत समिती सभापतिपदासाठी दत्तात्रय जाधव यांच्या नावाची शिफारस केली होती; परंतु पक्षाचा व्हिप असतानाही त्यांच्या विरोधात मतदान करण्यात आले. याला खासदार संजय जाधव यांनी पाठबळ दिले आहे. पक्षाअंतर्गत गटबाजी सुरु झाली आहे. या गटबाजीचा फटका आपल्यालाही बसला आहे. - आमदार फड

परभणी - पक्षाचा व्हिप धुडकावून मानवत पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा दिल्याने नाराज झालेल्या आमदार मोहन फड यांची अखेर समजूत काढण्यात आली. आपण सुचविलेल्या उमेदवारांना डावलण्यात आले आणि बंडखोराला खासदार संजय जाधव यांनी पाठबळ दिले, असा आरोप करत आपण या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे आमदार मोहन फड यांनी सांगितले आहे.

परभणी जिल्ह्यातील नऊ पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतिपदाची निवड मंगळवारी झाली. मानवत पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी शिवसेनेने दत्तात्रय जाधव यांच्या नावाने व्हिप बजावला होता. मानवत पंचायत समितीमध्ये आठपैकी सहा जागेवर शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले आहेत. उर्वरित दोन जागेवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. सभापतिपदासाठी मानोली गणातून विजयी झालेले बंडू सखाराम मुळे आणि मंगरूळ (बु.) गणातून विजयी झालेले दत्तात्रय जाधव हे प्रबळ दावेदार मानले जात होते. प्रत्यक्ष निवडणुकीत शिवसेनेत दोन गट पडले. दत्तात्रय जाधव आमदार मोहन फड यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे आमदार फड यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली; परंतु शिवसेनेचेच बंडू मुळे यांनीही सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. बंडू मुळे यांना चार मते मिळाली. तर दत्तात्रय जाधव यांना दोन मते मिळाली.

या घटनेमुळे नाराज झालेल्या आमदार मोहन फड यांनी आपण पक्षाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर करून तसा निरोप पत्रकारांना देऊन पत्रकार परिषदेचे आमंत्रण दिले. पत्रकार परिषद सुरु होण्याआधीच जिल्हा सह संपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर, जिल्हा प्रमुख गंगाप्रसाद आणेराव, परभणीचे आमदार डॉ. राहूल पाटील यांनी आमदार मोहन फड यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तब्बल एक तास त्यांची समजूत काढण्यात आली. त्यानंतर सर्वांनी मिळून पत्रकारांशी वार्तालाप केला; परंतु पत्रकार परिषदेतही आमदार फड यांच्या मनातील नाराजी प्रत्यक्षपणे दिसून येत होती.
स्वत: पत्रकार परिषद बोलावूनही त्यांनी सुरवातीला एक शब्दही काढला नाही. त्यांच्यातर्फे सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदरच पत्रकारांशी बोलत होते. ज्या वेळी पत्रकारांनी फड यांनाच प्रश्न विचारण्यास सुरवात केली. तेव्हा त्यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे बोलून दाखविली.

जाणीवपूर्वक डावलले जाते - आमदार फड
आमदार मोहन फड म्हणाले की, आपल्यासोबत असे प्रकार होण्याची ही चौथी वेळ आहे. मी ज्या कार्यकर्त्याची शिफारस करतो, त्याला जाणीवपूर्वक डावलले जाते. मानवत पंचायत समिती सभापतिपदासाठी दत्तात्रय जाधव यांच्या नावाची शिफारस केली होती; परंतु पक्षाचा व्हिप असतानाही त्यांच्या विरोधात मतदान करण्यात आले. याला खासदार संजय जाधव यांनी पाठबळ दिले आहे. पक्षाअंतर्गत गटबाजी सुरु झाली आहे. या गटबाजीचा फटका आपल्यालाही बसला आहे. अद्याप मी कोणत्याही निर्णयापर्यंत आलो नाही; परंतु या प्रकारासदर्भात जिल्हा संपर्कप्रमुखांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतरच निर्णय घेईल.

गैरसमजूतीतून प्रकार - डॉ. नावंदर
जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ. विवेक नावंदर म्हणाले की, मानवत येथे घडलेला प्रकार हा गैरसमजूतीतून घडला आहे. पक्षाचा व्हिप दत्तात्रय जाधव यांच्या नावाने होता; परंतु सदस्यांनी तो पाळला नाही. या संदर्भात योग्य ती चौकशी करून जिल्हा संपर्कप्रमुखांना अहवाल पाठविणार आहे. भविष्यात पक्षात अशा घटना घडू नयेत यासाठी व्हिप डावलणाऱ्या सदस्यांवर कडक कारवाई केली जाईल. पक्षात कोणतीही गटबाजी नाही.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख