'बक्षिसी' आणि 'तडजोडी'चे उद्योग पूर्ण झाले, आता कामाला लागा : शिवसेनेचा सल्ला नक्की कुणाला?

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. कालच मंत्र्यांचे खातेवाटपही पूर्ण झाले. त्यावर शिवसेनेने 'सामना'तून भाष्य केले आहे.
Shivsena Comment About Maharashtra Cabinet Expansion
Shivsena Comment About Maharashtra Cabinet Expansion

मुंबई : मंत्रीमंडळाचे खातेवाटप झाले असून आता मंत्रीमंडळाने कामाला लागायला हवे. मंत्रीपदे व खातेवाटप हे एकप्रकारे 'बक्षिसी' आणि 'तडजोडी'चे उद्योग असतात. ते पूर्ण झाले आता कामाला लागा, असा सल्ला शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून नव्या मंत्र्यांना दिला आहे. 

राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. कालच मंत्र्यांचे खातेवाटपही पूर्ण झाले. त्यावर शिवसेनेने 'सामना'तून भाष्य केले आहे. राज्यपालांनी खातेवाटपाला शनिवारीच मंजुरी न दिल्याबद्दलही या अग्रलेखात टोमणे मारण्यात आले आहेत. आपल्या अग्रलेखात 'सामना' म्हणतो......

........शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे खातेवाटपाची यादी मंजुरीसाठी पाठवली. पण राज्यपालांची झोपण्याची म्हणजे विश्रांतीची वेळ झाल्याने ते खातेवाटपाच्या प्रस्तावावर सही करु शकले नाहीत. शेवटी रविवारच्या रामप्रहरी राज्यपालांच्या सहीशिक्क्याने खातेवाटप झाले आहे. जे राज्यपाल देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना शपथ देण्यासाठी रात्रभर राजभवन उघडे ठेवतात व स्वतःही जागतात त्या राज्यपालांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारावर सही केली नाही व ते विश्रांतीसाठी निघून गेले याबद्दल शरद पवारांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे. राज्यपालांनी रामप्रहरी सही केली. आता 'रामराज्य' येईल ही जनतेची अपेक्षा आहे. ती पूर्ण होऊ द्या इतकंच!

राज्याचे गृहमंत्रीपद अनिल देशमुख यांच्याकडे देण्यात आले. त्यावरही या अग्रलेखात टिपण्णी करण्यात आली आहे. याबाबत शिवसेना म्हणते......नव्या खातेवाटपानुसर अजित पवार यांनी अर्थ व नियोजन खाते घेतले. उपमुख्यमंत्रीपदाचा 'तुरा'ही मिळवला. दुसरे भाग्यवान ठरले आहेत नागपूरचे अनिल देशमुख. ''आमच्याकडे गृहखाते कुणी घ्यायलाच तयार नाही, गृहखाते नको असे सांगणारेच जास्त आहेत," अशी माहिती खुद्द शरद पवार यांनीच दोन-तीन दिवसांपूर्वी दिली होती. त्यामुळे गृहखाते अनिल देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय? अशी खोचक विचारणा शिवसेनेने केली आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते स्वतःकडे ठेवले होते. त्यावरही शिवसेनेने निशाणा साधला आहे. 'गृहखाते हे जोखमीचे काम आहे. गेल्या काही वर्षांत ते आर. आर. पाटील, जयंत पाटील, भुजबळ वगैरे मंडळींनी सांभाळले. भाजप राजवटीत गृहखात्याची नंगी तलवार हाती घेऊनच मुख्यमंत्री फडणवीस फिरत होते. पण शेवटी या तलवारीनेच त्यांचा घात केला.' असे या अग्रलेखात म्हटले आहे.

'भीमा कोरेगाव प्रकरणाच राज्याचे गृहखाते हतबल झाल्याचे दिसले, पण विरोधकांचा काटा काढण्यात ते तत्पर ठरले. तेव्हा हे खाते जोखमीचे आहे. खरेतर अजित पवार किंवा दिलीप वळसे-पाटलांसारखा नेता गृहखाते सांभाळण्यास सक्षम होता, पण शरद पवारांनी भाकरी फिरवत गृहखाते विदर्भाकडे वळवले आहे. पवारांचा हा नवा प्रयोग किती यशस्वी होतो ते दिसेलच,' असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

बाकीच्या मंत्र्यांच्या खात्याचाही यात आढावा घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे कमी खाती ठेवली, याचाही आवर्जून उल्लेख करण्यात आला आहे. मुंबई ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले गृहनिर्माण खाते जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देऊन शरद पवार यांनी आव्हाडांच्या निष्ठेचे बक्षीस दिले आहे, असाही उल्लेख यात करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com