आमदार सीमा हिरेंच्या कार्यालयात शिवसेना नेत्याचा थटथयाट! 

आधार कार्ड काढण्यासाठी आमदारांचे शिफारस पत्र घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना आमदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेना नेते सचिन राणे यांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयात अक्षरशः गोंधळ घालत कार्यालय डोक्‍यावर घेतले.
आमदार सीमा हिरेंच्या कार्यालयात शिवसेना नेत्याचा थटथयाट! 

नाशिक : आधार कार्ड काढण्यासाठी आमदारांचे शिफारस पत्र घेण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना आमदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी नकार दिला. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शिवसेना नेते सचिन राणे यांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या कार्यालयात अक्षरशः गोंधळ घालत कार्यालय डोक्‍यावर घेतले. यावेळी आमदार सीमा हिरे व त्यांच्या पतींनी समजुत काढण्याचा प्रयत्न केला. 'हवे तर कोऱ्या दाखल्यावर सह्या करुन देतो, मात्र आवाज खाली आणा,' असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर राणे यांनी "विद्यार्थ्यांना दाखले का देत नाहीत. असा कारभार चालणार नाही.'' असे सुनावले.

आधार कार्डसाठी आमदारांचे शिफारस पत्र न दिल्याने सोमवारी दुपारी शिवसेना नगरसेविका रत्नमाला राणे यांचे पुत्र व शिवसेना नेते सचिन राणे यांनी भाजपा आमदारांच्या कार्यालयात गोंधळ घातला. त्यामुळे कार्यालयामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी पत्रकारांसह काही नागरीकांच्या उपस्थितीतच हा वाद रंगल्याने आमदारांची मात्र कुचंबणा झाली. राणे यांच्या संपर्कातील एका विद्यार्थ्यास आधार कार्ड काढायचे होते. त्याकरिता रहिवासी पुरावा म्हणून आमदारांच्या दाखला वजा शिफारस पत्राची गरज होती. सध्या असे पत्र सक्तीचे केल्याचा त्यांचा दावा होता.

याकरिता सचिन राणे यांनी भाजप आमदार सीमा हिरे यांच्या सिडकोतील उत्तम नगर जवळच्या कार्यालयात पाठवले होते. मात्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे दाखले देता येणार नाही. असे सांगून त्यांना परत पाठवले. हे विद्यार्थी पुन्हा राणे यांच्याकडे तक्रार घेऊन गेले. त्यावरुन हा वाद चांगलाच रंगला. 

संतप्त सचिन राणे यांनी सोमवारी दुपारी आमदार हिरे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन संबंधित कर्मचाऱ्यांशी वाद घेतला. "दाखला का देत नाही?'' याची विचारणा केली. राणे यांचा आवाज एव्हढा वाढला की सबंध कार्यालय त्यांनी डोक्‍यावर घेतले. यावेळी आमदार हिरे, त्यांचे पती महेश हिरे यांनी या गोंधळामुळे "बाहेर कोण आहे?'' अशी विचारणा केली व संबंधितांला शांत राहण्याची विनंती करु लागले. यावेळी राणे यांनी त्यांना घडलेला प्रकार सांगितला. संतप्त राणे यांनी आपला आवाज तसाच ठेवून सीमा हिरे यांना आपले कर्मचारी दाखले का देत नाही? याचा जाब विचारला.

यावेळी आमदार हिरे यांनी देखील राणे यांना शांतपणे बोलण्याची विनंती केली. परंतु, राणेंचा आवाज कमी होत नव्हता. शेवटी श्री. महेश हिरे यांनी "आम्ही तुम्हांला कोऱ्या दाखल्यावर सह्या करून देतो परंतु चिडू नका'' अशी विनंती केली. त्यानंतर जमलेली गर्दी पाहून संतप्त राणे यांनी कार्यातून काढता पाय घेतला. 

ही घटना इतर पदाधिकारी देखील बघत होते. त्यानंतर याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली. चिडलेल्या राणे यांनी बाहेर देखील भाजपा नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांचे पती राकेश ढोमसे यांना सदर प्रकार कथन केला. त्यामुळे आता हा वाद विकोपाला जातो की काय? असे चित्र या ठिकाणी बघायला मिळत होते. सध्या शालेय प्रवेश सुरू असल्याने विविध प्रकारचे दाखले यांची मागणी सेतू कार्यालय व ई-महा सेवा केंद्र चालकांकडून होत आहे. त्यामुळे दाखले घेण्यासाठी नागरिक व आमदार यांच्याकडे नागरिक व विद्यार्थ्यांची गर्दी दिसत आहेत अशातला हा प्रकार घडल्याने एका वेगळ्या चर्चेला तोंड फुटले आहे. 

दाखल्यासाठी पत्र न मिळाल्यामुळे हा प्रकार घडला. मात्र,मी प्रत्येक नागरीकाचे काम करण्यासाठी तत्पर असते. संबंधीत प्रकरणात काय घडले याची माहिती घेणार आहे - आमदार सीमा हिरे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com