काँग्रेस, शिवसेना, 'एमआयएम'चा दोस्ताना मालेगावमध्ये काँग्रेसचा महापौर, शिवसेनेचा उपमहापौर

काँग्रेस, शिवसेना, 'एमआयएम'चा दोस्ताना मालेगावमध्ये काँग्रेसचा महापौर, शिवसेनेचा उपमहापौर

मालेगाव - मालेगाव महापालिकेत आज झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे रशीद शेख महापौर तर शिवसेनेचे सखाराम घोडके उपमहापौरपदी निवडून आले. त्यांच्या या यशासाठी एकमेकांना सतत पाण्यात पाहणारी, टोकाचे राजकीय मतभेद असलेली शिवसेना व एमआयएम एकत्र आली होती. त्याचे बक्षीस म्हणून 'एमआयएम'च्या पसंतीच्या एकाला स्विकृत नगरसेवक केले जाणार आहे.

महापालिकेत काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख 41 मते मिळवून महापौर झाले. शिवसेनेचे सखाराम घोडके यांनाही तेवढीच मते मिळाली. तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नबी अहमद अहमदुल्ला यांना 34 मते मिळाली. मालेगाव महापालिकेच्या पंधरा वर्षाच्या इतिहासात शिवसेनेला पहिल्यांदाच पद मिळाले व त्यांचे सखाराम घोडके यांनी 41 मते मिळवून आघाडीचे मन्सुर अहमद यांचा पराभव केला. यावेळी भाजपचे 7 व एमआयएमचे 9 सदस्य तटस्थ राहिल्याने अहमद यांना केवळ 27 मते मिळाली. यानिमित्ताने महापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेस -शिवसेना सहकार्य पर्व सुरु झाले.

त्यात एमआयएम देखील अप्रत्यक्ष सहभागी असणार आहे. स्विकृत नगरसेवकाच्या निवडणूकीत त्यांना त्याचे फळ मिळेल. नुकत्याच झालेल्या निवडणूकीत काँग्रेसला 28 जागा मिळून तो सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. तर राष्ट्रवादी काँग्रेस- जनता दल युतीला 27 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचे तेरा, 'एमआयएम'चे सात आणि भाजपचे नऊ नगरसेवक निवडून आले. दोन्ही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी पारंपरिक सहकारी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील असे संकेत दिले होते. त्यासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली असता मुस्लीमबहुल विधानसभा मतदारसंघ असलेल्या मालेगावची स्थानिक समिकरणे पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार मौलाना मुफ्ती यांनी त्याला नकार दिला होता. त्यामुळे राजकीय पेच निर्माण झाला होता.

त्यावर तोडगा म्हणून काँग्रेसचे माजी आमदार रशीद शेख यांनी वेगाने राजकीय समिकरणांची मांडणी करीत पारंपरिक पध्दतीने मुस्लीम महापौर तर हिंदू उपमहापौर हे गणित जुळविण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांना राजी केले होते. त्यात बहुमतासाठी 43 ची 'मॅजीक फिगर' गाठण्यासाठी अडथळा होताच. त्यात 'एमआयएम'ला तटस्थ राहण्यात राजी केल्याने बहुमताचे गणित जुळले.

भाजपमध्ये फूट
या निवडणुकीत भाजपचे नऊ सदस्य निवडून आले होते. त्यांनी महापौर पदाच्या निवडणुकीत मालेगाव विकास आघाडी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले. मात्र, हा निर्णय मान्य नसल्याने दिपाली वारुळे आणि विजय देवरे हे दोन सदस्य निवडणूक प्रक्रीयेत अनुपस्थित राहिल्याने भाजपमध्ये फूट पडली. पक्षाचे सुनिल गायकवाड यांना उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com