Sena congress and BJP NCP join hands Panchayat Elections | Sarkarnama

शिवसेनेचे काँग्रेसशी, तर भाजपचे राष्ट्रवादीशी जमले

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 मार्च 2017

कुणाचा कुठे सभापती
औरंगाबाद- काँग्रेस
खुल्ताबाद- भाजप
फुलंब्री-भाजप
सिल्लोड-भाजप
गंगापूर-भाजप
वैजापूर-भाजप
पैठण-शिवसेना
कन्नड-अपक्ष
सोयगांव-काँग्रेस

औरंगाबाद - शिवसेनेने भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसशी हातमिळवणी केल्यावर भाजपने देखील राष्ट्रवादीशी घरोबा केल्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील 9 पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. भाजपने चार पंचायत समित्यांवर बहुमतासह सभापती बसवले. तर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर वैजापूर पंचायत समितीमध्ये भाजपने सभापतीपद मिळवत शिवसेनेला जशास तसे उत्तर दिल्याचे दिसते. शिवसेनेला पैठण वगळता कुठेही सभापती करता आला नाही. काँग्रेसने शिवसेनेच्या पाठिंब्यावर औरंगाबाद व सोयगांव पंचायत समितीमध्ये सभापतीपद मिळवले. कन्नडमध्ये आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या आघाडीने राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवारास सभापती केले.

शिवसेना व काँग्रेसमध्ये युती झाल्यामुळे औरंगाबाद पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या ताराबाई उकीर्डे सभापती तर शिवसेनेच्या कविता राठोड या उपसभापती पदी विराजमान झाल्या. शिवसेनेने काँग्रेसची साथ घेतल्यामुळे आता औरंगाबाद व जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शिवसेनेने दगाफटका केल्याची भावना भाजपमध्ये असल्यामुळे वैजापूरात भाजपने राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत इंदूबाई सोनवणे यांना सभापतीपदी विराजमान केले.

गंगापूरात भाजपची चिठ्ठी
गंगापूर पंचायत समितीत शिवसेना व भाजप या दोघांचे अनुक्रमे 9 सदस्य निवडून आले. त्यामुळे सभापती, उपसभापती निवड चिठ्ठी टाकून करण्यात आली. यात भाजपची लॉटरी लागली. सभापती व उपसभापती या दोन्ही चिठ्या भाजप उमेदवाराच्या निघाल्याने इथे शिवसेनेला नशिबाने दगा दिल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होती.

"जय हो आणि जय महाराष्ट्र'
औरंगाबाद पंचायत समितीत एकूण 20 सदस्य होते. यामध्ये कॉंग्रेसचे सर्वाधिक 8, भापज 7, शिवसेना 3 तर अपक्ष दोन असे पक्षीय बलाबल होते. यामध्ये काँग्रेसला बहुमतासाठी तीन सदस्यांची आवश्‍यकता होती. शिवसेना सोबत आल्याने त्यांना पुन्हा सत्ता कायम राखणे सहज सोपे झाले. मात्र, भाजपचा हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास शिवसेनेच्या भूमिकेमुळे भापजला गमवावा लागला. सभापती, उपसभापती निवडीनंतर पंचायत समिती परिसरात जय हो आणि जय महाराष्ट्रच्या जोरदार घोषणा शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख