शिवसेना, भाजपकडून नाशिककरांना पाच वर्षे विकासाचे 'एप्रिल फुल' - समीर भुजबळ

चार-साडेचार वर्षे एकत्र नांदताना सजग सासू-सुनासारखं भांडत उध्दव ठाकरेंनी कमळाच्या पाकळ्या पाकळ्या वेगळ्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघाच्या जबड्यात हात घालण्याची हिम्मत असल्याची भाषा केली. या दोघांनीही केवळ देखावा उभा करुन गेली पाच वर्षे दत्तक घेतलेल्या नाशिककरांना विकासाच्या नावाने 'एप्रिल फुल' केलं - समीर भुजबळ
शिवसेना, भाजपकडून नाशिककरांना पाच वर्षे विकासाचे 'एप्रिल फुल' - समीर भुजबळ

नाशिक : "लोकांना मूर्ख बनविण्यात शिवसेना आणि भाजप या पक्षांचा हात कोणीच धरु शकणार नाही. गेली चार-साडेचार वर्षे एकत्र नांदताना कजाग सासू-सुनासारखं भांडत उध्दव ठाकरेंनी कमळाच्या पाकळ्या पाकळ्या वेगळ्या केल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघाच्या जबड्यात हात घालण्याची हिम्मत असल्याची भाषा केली. या दोघांनीही केवळ देखावा उभा करुन गेली पाच वर्षे दत्तक घेतलेल्या नाशिककरांना विकासाच्या नावाने 'एप्रिल फुल' केलं. यामध्ये त्यांचे स्थानिक खासदार, आमदारही सहभागी होते," असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार समीर भुजबळ यांनी केला.

भुजबळ म्हणाले, ''लोकांना मूर्ख बनविण्यासाठी 'एप्रिल फूल'म्हणत वर्षातून एकदाच करायचे असते, पण या दोन्ही पक्षांनी साडे चार वर्षे दररोजच लोकांना एप्रिल फूल करुन फसविले आहे. प्रचारातही यांचा एप्रिल फूल खेळ सुरुच आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत जनता त्यांना एप्रिल फुल करुन घरी पाठवेल. ते म्हणाले, सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासनाला हरताळ फासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला मूर्ख बनविले. नाशिकला दत्तक घेण्याचे वचन देणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिककरांची फसवणूक केली. राम मंदिरासाठी अयोध्येत जाऊन पूजा करणाऱ्या उध्दव ठाकरेंनी केवळ राम भक्तांची नाही तर रामाचीही फसवणूक केली. आधी मंदिर मग सरकार अशी घोषणा करणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी सत्तेसाठी लाचार होऊन मोदी-शहापुढे शरणागती पत्करली तेव्हा जबड्यात हा घालून वाघाची बत्तिशी भाजपाने उतरविल्याची प्रतिक्रियाही लोकांमध्ये उमटली."

एप्रिल फूल करण्यात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस जितके तरबेज आहेत, तितकेच तरबेज नाशिकचे शिवसेना खासदार-आमदार आणि भाजपचे आमदार आहेत, असे सांगून भुजबळ म्हणाले, "विकास कामे करता आली नाही म्हणून या भगव्या लोकांनी दररोज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नावाने शिमगा साजरा करुन लोकांना मूर्खात काढले आहे. नजरेत भरणारे एकही विकास काम यांच्याकडे नाही, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या पाच वर्षात एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही तर इकडे हेमंत गोडसे पत्रकारांना मुलाखत देण्यास घाबरतात. प्रश्न विचारणाऱ्या कोणत्याही माणसापासून ते पळ काढतात, मग तो साधा विद्यार्थी असला तरी त्याला समाधानकारक उत्तर देण्याची गोडसेंची हिम्मत नाही. काही कामच केलं नाही तर सांगणार काय?" असा प्रश्न नाशिकच्या खासदाराला सतत भेडसावत आहे. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना महाले, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कॉंग्रेसच्या माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर आदी नेते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com