sena bjp alliance | Sarkarnama

शिवसेना-भाजपसाठी ही "युती'च राहणार

प्रकाश पाटील
गुरुवार, 6 एप्रिल 2017

शिवसेना-भाजप युतीचे भविष्य काय आहे हे माहीत नाही. माझ्या बाबांनी दोन्ही पक्षाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझे नाव युती ठेवले याचा मला अभिमान आहे. मी "युती' फक्त शिवसेनेची नाही. तर भाजपचीही आहे. दोन्ही पक्ष माझेच आहेत. जरी माझे बाबा शिवसेनेचे असले तरी ! असे युती मोरेचे म्हणणे आहे. 

केरळच्या निसर्गरम्य सौंदर्याच्या प्रेमात पडलेल्या परदेशी जोडप्याने आपल्या मुलीचे नाव चक्क केरळ असे ठेवले होते. चार्ल्स क्रॅमर आणि त्यांची पत्नी ब्रीना हे 2004 मध्ये केरळमध्ये प्रथम आले होते. संपूर्ण जगात हे राज्य वेगळं आहे असे त्यांना वाटले. पुढे हे जोडपे लॉस एन्लिसचा परतले.2009 मध्ये त्यांना मुलगी झाली. त्यावेळी त्यांनी कोणताही विचार न करता मुलीचे नाव चक्क केरळ असे ठेवले होते. ही छोटी बातमी परदेशातील एका जोडप्याची असली तरी आपल्या देशातही अशी शेकडो उदाहरणे देता येतील. माझा एक मित्र आणि शिवसेनेचे कार्यकर्ते विकास मोरे यांच्या मुलीचे नाव "युती' आहे. या नावाची कहाणीही मजेशीर आहे. 

पूर्वी देवादिकांबरोबरच संत, राजे,महाराजे यांच्या नावावरून मुला-मुलींची नावे ठेवली जात. शिवाजी, तुकाराम, ज्ञानेश्‍वर, संभाजी, शंकर, पार्वती, राम, लक्ष्मण, कृष्ण अशी ती असंत. आताच्या जगात तर चित्र विचित्र नावे ठेवण्याची प्रथा आली. खूप सुंदर आणि काहीशी वेगळी वाटणारी नावेही मनातून जात नाही. मुलगा-मुलगी झाली की नाव काय ठेवायचे याचा शोध सुरू होतो. शेकडो नव्हे तर हजारो नावांची यादी तयार केली जाते. त्यापैकी एक नाव निवडले जाते. आपण किती जरी म्हटले की नावात काय आहे ? तरीही नावात काही तरी असतेच. त्यामागे काही तरी दडलेले असतेच. 

स्वातंत्र्य लढ्यातही देशाच्या नावावरूनही मुलामुलींची नावे ठेवली जात होती. कुणाचे नावा भारत, स्वराज, आझाद अशी असंत. तसेच स्वातंत्र्य लढ्यातील महान नेत्यांची नावेही ठेवली जात. महान नेते जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनानंतर समाजवादी नेत्यांच्या मुलांची नावेही अशीच ठेवण्यात आली होती. त्यापैकी एक आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी आपल्या मुलीचे नाव "मिसा' असे ठेवले होते. "मिसा' आता खासदार आहेत. आणीबाणीच्या काळात देशभरात मिसा कायद्याखाली भलेभले नेते तुरुंगात होते. त्यावेळी लालू यांना मिसाखाली अटक झाली होती. लालूंना जेंव्हा पहिली मुलगी झाली तेव्हा त्यांनी मुलीचे नाव मिसा असे ठेवले होते. (पुढे लालूंना वेगवेगळ्या कारणांसाठी अनेकवेळा अटक झाली तो वेगळा विषय आहे) 
1995 मध्ये महाराष्ट्रात इतिहास घडला. भलेभले लोक सांगत होते महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचे सरकार कधीच सत्तेवर येणार नाही. पण, हा समज खोटा ठरला. युतीचे सरकार सत्तेवर आले. त्यावेळी युतीच्या कार्यकर्त्यांच्या अंगात जल्लोश संचारला होता. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी किमया करून दाखविली. कॉंग्रेसला लोळवले होते. "युती' हा शब्द राज्यातच नव्हे तर देशात प्रसिद्ध झाला. त्यावेळी माझा एक मित्र आणि शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि माहीम गावचे सरपंच (जि. पालघर) विकास मोरे यांना मुलगी झाली. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीचे नाव "युती' ठेवले होते. आता ही युती 23 वर्षाची झाली आहे. आज दोन दशकानंतर युतीत प्रचंड तणाव आहे. शिवसेना दररोज भाजपवर आणि भाजप शिवसेनेवर शरसंधान करीत आहे. युती कधी तुटेल हे सांगता येत नाही. पण, मोरेंची ही "युती' शिवसेना भाजपचीच आहे. या दोन्ही पक्षाचे काहीही होवो पण, ही युती दोन्ही पक्षाचीच राहणार आहे. 
या दोन्ही पक्षाच्या संबंधाबाबत विकास मोरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "" मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजींचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. अनेकपदे शिवसेनेमुळे मला मिळाली. हे खरे आहे. हे दोन्ही पक्ष आमच्यासाठी आदर्श होते. ही युती कायम टिकावी असे नेहमीच वाटते. या दोन्ही पक्षाचे प्रतीक म्हणूनच मी माझ्या मुलीचे नाव युती ठेवले होते. या दोन्ही पक्षाची युती टिकली किंवा नाही टिकली तरी माझी लाडकी लेक या दोन्ही पक्षासाठी कायमच "युती' राहणार आहे. 
शेतकरी कर्जमाफी असो किंवा इतर मुद्दे शिवसेना-भाजपची युती टिकावी अशी हजारो कार्यकर्त्यांची इच्छा आहे. युतीचे भविष्य काय असेल सांगता येत नाही. माझ्या बाबांनी दोन्ही पक्षाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माझे नाव युती ठेवले याचा मला अभिमान आहे. माझे नाव थोडे इतरांपेक्षा वेगळे आहे. मैत्रिणी अनेकदा मला विचारतात युती नावाविषयी. तेव्हा मला दोन्ही पक्षाचे स्पष्टीकरण द्यावे लागते. माझे नाव काहीसे वेगळे असल्याचा म्हणूनच मला अभिमान आहे. मी युती फक्त शिवसेनेची नाही. तर भाजपचीही आहे. दोन्ही पक्ष माझेच आहेत. जरी माझे बाबा शिवसेनेचे असले तरी ! 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख