sena bjp | Sarkarnama

मराठवाड्यात इतरांशी युती करत शिवसेनेचा भाजपला जोरदार धक्का

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 मार्च 2017

औरंगाबाद ः शिवसेना व भाजप या दोन पक्षांमधल्या देश व राज्य पातळीवर बिघडलेल्या संबंधाचा सर्वाधिक फटका भाजपला मराठवाड्यात बसल्याचे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुक निकालावरुन स्पष्ट झाले आहे. नंबरवनच्या स्पर्धेत भाजपने शिवसेनेच्या वाघाला डिवचले आणि अखेर वाघाने "पंजा' मारलाच.

औरंगाबाद ः शिवसेना व भाजप या दोन पक्षांमधल्या देश व राज्य पातळीवर बिघडलेल्या संबंधाचा सर्वाधिक फटका भाजपला मराठवाड्यात बसल्याचे नुकत्याच झालेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुक निकालावरुन स्पष्ट झाले आहे. नंबरवनच्या स्पर्धेत भाजपने शिवसेनेच्या वाघाला डिवचले आणि अखेर वाघाने "पंजा' मारलाच.

भाजपला अद्दल घडवण्याच्या निर्धारातूनच शिवसेनेने मुंबई महापालिकेसह सर्वच निवडणुकीत भाजपशी काडीमोड घेतला. मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी पारदर्शकतेच्या नावाखाली भाजपने सुडाचे राजकारण करत शिवसेनेला संपवण्याचाच प्रयत्न चालवल्याची भावना शिवसैनिकांची झाली आणि मग भाजपला रोखण्यासाठी वाटेल ते करण्याची रणनिती आखण्यात आली. त्यातून काही ठिकाणी शिवसेनेचा बाण आणि कॉंग्रेसचा पंजा, तर कुठे राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर बांधत या तीन पक्षांनी भाजपला खिंडीत गाठले. मराठवाड्यातील 8 पैकी 3 जिल्हा परिषदांवर भगवा फडकवत शिवसेनेच्या धनुष्यबाणाने कमळाच्या पाकळ्या तोडल्या आहेत. या वाहत्या गंगेत मग कॉंग्रेस-राष्ट्रवादीने देखील हात धूवुन घेतले. भाजप-राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन तर कॉंग्रेसला नांदेडची सत्ता मिळाली आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पडद्या मागे ठरले तसेच समोर घडले. लातूर जिल्हा परिषदेतले बहुमत सोडले तर भाजपला औरंगाबाद, जालना या दोन महत्वाच्या जिल्ह्यामध्ये सत्तेसाठी शिवसेनेच्या आधाराची गरज होती. पण मुंबईच्या नादात भाजपचा हा आधार गमावला गेला. त्यामुळे औरंगाबाद, जालना जिल्हा परिषदेत हातातोंडाशी आलेला भाजपचा सत्तेचा घास कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने पळवला. फोडाफोडी, आमिष आणि चाणक्‍य निती देखील भाजपला तारु शकली नाही. 
दानवेंना खोतकर भारी ठरले 
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा जालना मतदारसंघ व जिल्ह्यातच भाजपला आपटी खावी लागली हे विशेष. सत्ता व अध्यक्ष आमचाच होणार असा दावा दानवेंकडून सुरु असतांना शिवसेनेचे राज्यमंत्री खोतकर यांनी मात्र कुठलाही गाजावाजा न करता अध्यक्षपदाची पक्की फिल्डींग लावून ठेवली होती. त्यामुळे मुलगी आशा पांडे, किंवा मुलगा राहूल लोणीकर यांना अध्यक्ष करण्याचे रावसाहेब, बबनराव यांचे स्वप्न भंगले. तर भावाला अध्यक्ष करण्याची खोतकरांची खेळी यशस्वी ठरली. त्यामुळे भल्याभल्यांना चकवा देण्यात प्रसिद्ध असलेल्या दानवे व भाजपला शिवसेनेने चकवा दिल्याची जोरदार चर्चा जालना जिल्ह्यात सुरु झाली आहे. 
औरंगाबादेत भगव्याचाच जोर 
कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली औरंगाबाद जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेला मिळाली पण त्यासाठी कॉंग्रेसशी हातमिळवणी करण्याचा मोठा धोका त्यांना पत्करावा लागला. भाजपसोबत जाऊन दुय्यम स्थान स्वीकारण्यापेक्षा कॉंग्रेसचा हात धरून सत्तेच्या खुर्चीत बसण्याचा निर्णय तुर्तास तरी योग्य असल्याचे बोलले जाते. शिवसेना संपवायला निघालेल्या भाजपला मिनी मंत्रालयाच्या चाव्या देणे म्हणजे आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यासारखे ठरेल याची जाणीव शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वाला झाली होती. परिणामी भाजपपेक्षा कॉंग्रेस बरी म्हणत शिवसेनेने कॉंग्रेसला देखील जिल्ह्यात संजीवनी देण्याचे काम केले. या नव्या राजकीय समीकरणातून आता चंद्रकांत खैरे यांनी आपला लोकसभा मतदारसंघ आणखी मजबूत करुन घेतल्याची कुजबूज सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेतील सत्तेमुळे शिवसेनेला आपला खिळखिळा झालेला पाया मजबुत करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जाते. 
बीडमधील चमत्काराचे शिल्पकार मुख्यमंत्रीच 
राष्ट्रवादीची मजबूत पकड असलेल्या बीड जिल्हा परिषदेत भाजपने शेवटच्या क्षणी सुरेश धस यांना आपल्या बाजून वळवत चमत्कार घडवला. 20 सदस्य असलेल्या भाजपच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराला 34 मते मिळाली हा तो चमत्कार.

परळी नगरपालिका निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजप दुसऱ्या क्रमांकावर गेल्याने राज्याच्या ग्रामविकास व जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले होते. पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंकजा यांनी देखील राजीनामा देण्याची तयारी दाखवली. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना सबुरीन घेण्याचा सल्ला दिला. त्या श्रध्दा आणि सबुरीचे फळ जिल्हा परिषदेतील सत्तेच्या रुपात भाजपला मिळाले. राष्ट्रवादीतील अविश्‍वासाचे वातावरण, कुरघोडीचे राजकारण भाजपच्या पथ्यावर पडले. भाजपचा अध्यक्ष विराजमान झाल्यावर पंकजा यांनी मी जादूची कांडी फिरवल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. पण खरे जादूगर मुख्यमंत्रीच आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईत पंकजा व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित धस यांच्या सोबत झालेल्या बैठकीत या चमत्काराचा मुर्हूत ठरवण्यात आला होता. धनंजय मुंडे यांना स्वतःवरचा अतिविश्‍वास नडला. तर क्षीरसागर एकमेकाशी भांडण्यात दंग राहिल्याने राष्ट्रवादीचे घड्याळ बीडमध्ये बंद पडले. 
लातूरात शतप्रतिशत, उस्मानाबादेत पारदर्शक पाठिंबा 
संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीपासून सुरु झालेली विजयी घोडदौड जिल्हा परिषदेत देखील कायम राहिली. बहुमतासह सत्ता मिळाल्यामुले इथे निलंगेकरांचा वरचष्मा राहिला. अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पद त्यांनी आपल्या तालुक्‍याकडे ठेवली. आगामी महापालिका निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली भाजपने जिंकली तर खऱ्या अर्थाने लातूर कॉंग्रेसमुक्त होईल अशी चर्चा आहे.

तिकडे उस्मानाबादेत दहा वर्षांनी राष्ट्रवादीला जिल्हा परिषदेतील सत्तेचा राज योग आला. शिवसेना-कॉंग्रेस व भाजप असे समीकरण जुळवून राष्ट्रवादीला पुन्हा रिंगणाबाहेर ठेवण्याचे प्रयत्न अखेरपर्यंत झाले. पण भाजपच्या (अ) पारदर्शक पाठिंब्याने राष्ट्रवादीचे फावले. भाजपच्या चार सदस्यांनी मतदानाच्या वेळी गैरहजर राहत राष्ट्रवादीच्या सत्तेचा मार्ग सुकर केला. याची परतफेड 2019 च्या लोकसभा व विधानसा निवडणुकीत भाजपला मदत करुन केली जाईल असे बोलले जाते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख