सेल्फी काढणाऱ्या राज्यकर्त्यांकडून मदत होईल, असे वाटत नाही : शरद पवारांची टीका

 सेल्फी काढणाऱ्या राज्यकर्त्यांकडून मदत होईल, असे वाटत नाही : शरद पवारांची टीका

सांगली : सांगली आणि कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी विलंब झाला. त्यामुळे लोकांच्या मनात सरकारी यंत्रणेविषयी नाराजी असल्याचे सांगत सेल्फी काढणाऱ्या राज्यकर्त्यांकडून मदत होईल, असे वाटत नसल्याची टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. 

कराड, पलूस आणि सांगली शहरातील पूरग्रस्त भागांची पाहणी आणि नागरिकांशी चर्चा  केल्यानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करतानाच्या त्यांच्या व्हिडीओची चर्चा सर्वत्र आहे. त्याबद्दल पवार यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत टीका केली. 

ते म्हणाले, ``महाराष्ट्रावर अशी संकटे यापूर्वी आली होती. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य म्हणजे संकट आल्यावर आपली प्रशासन यंत्रणा उत्तम काम करते. पुनर्वसन म्हणजे काय हे पाहण्यासाठी जागतिक बँकेने टीम पाठवली होती. पण या वेळी मदतीला विलंब झाला. लोकांच्या मनात सरकारी यंत्रणेबद्दल लोकांची नाराजी पसरली. सामाजिक संस्थाच्या कामाबद्दल लोकांमध्ये समाधान आहे. यामुळे पूरग्रस्तांना आधार मिळाला.``

राज्यातील अन्य भागातील महसूल यंत्रणा पूरग्रस्त भागात बोलवावी, अशी सूचना त्यांनी केली. पुराचे संकट येणार नाही, अशा ठिकाणी लोकांचे पुनर्वसन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अनेकांचे संसारोपयोगी साहित्य वाहून गेल्याने ते द्यायला हवे. येथून पुढे कदाचित सहा महिने शेतीची कामे नसतील. त्यासाठी रोजगाराची व्यवस्था करावी, असाही सल्ला त्यांनी दिला.

माझं पंतप्रधान मोदींशी बोलणे झाले आहे. सेल्फी काढणाऱ्या राज्यकर्त्यांकडून मदत होईल असे वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे ४० डॉक्टर पूरग्रस्त कार्यरत असून पाच ट्रक औषधे देण्यात आली आहेत. बारामती अॅग्रोकडून १० हजार सॅनिटरी पॅड पूरग्रस्त भागात देण्यात आल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com