खुद्द देवेंद्र फडणवीसांनीच काढला मुंदडा दाम्पत्यासोबत सेल्फी 

दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांची नात ऐश्वर्या यांचा विवाह समारंभ आष्टीत पार पडला. यावेळी उपस्थित नेते व कार्यकर्त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो, सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली.
selfie-by-CM
selfie-by-CM

बीड : राजकीय कार्यक्रम, सभा वा समारंभासाठी आलेल्या राजकीय नेत्यांसोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी उडी पडणे नवीन नाही. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो काढणे म्हणजे मोठी कसरत आणि निघाला तर नशिब अशीच स्थिती. पण, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच सेल्फी घ्यावा आणि तोही राष्ट्रवादी नेत्यासोबत असा दुर्मिळ योग परवा आष्टीत लग्न समारंभात आला. मात्र, यामागे कुठलाही राजकीय योग नसून कौटुंबिक स्नेहाचा भाग होता.

झाले असले, दोन दिवसांपूर्वी भाजपचे आमदार सुरेश धस यांचे चिरंजीव जयदत्त आणि माजी आमदार साहेबराव दरेकर यांची नात ऐश्वर्या यांचा विवाह समारंभ आष्टीत पार पडला. नवदाम्पत्याना आशिर्वाद देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस, मंत्री गिरीश महाजन, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री प्रा. राम शिंदे, मंत्री महादेव जानकर,  राज्यमंत्री अर्जुन खोतकर  आणि आमदारांचा ताफा समारंभ स्थळावरुन सुरेश धस यांच्या घरी जेवणासाठी पोचला.

 यावेळी उपस्थित नेते, कार्यकर्ते यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो, सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली. हसतमुख मुख्यमंत्रीही सर्वांची इच्छा पुर्ण करत होते. याच वेळी उपस्थित राष्ट्रवादीचे युवा नेते अक्षय मुंदडा म्हणाले ‘साहेब ही माझी पत्नी नमिता’, आठवणीसाठी एक सोबत फोटो घेऊ’ तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ‘मीच सेल्फी घेतो’ म्हणत मुंदडांच्या हातचा मोबाईल घेतला. सेल्फीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राष्ट्रवादीच्या नमिता मुंदडा, भाजप आमदार सुरेश धस, त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस कैद झाल्या. सहाजिकच मुख्यमंत्री सेल्फी घेतानाचे फोटोही इतरांनी मोबाईलमध्ये कैद केले. 

खुद्द मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर सेल्फी काढण्याने यामागे काही राजकीय अर्थ दडलाय का, याची चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरु झाली. पण, फडणवीस आणि मुंदडा यांचे १५ वर्षांपासूनचे स्नेह आहेत. दिवंगत नेत्या डॉ. विमल मुंदडा आरोग्य मंत्री असताना त्यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ समिती ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंड दौऱ्यावर गेली होती. या समितीत भाजप आमदार असलेले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस देखील होत्या. भाजप आमदार असलेले देवेंद्र फडणवीस यांची तत्कालिन आघाडी सरकारमधील इतर मंत्र्यांपेक्षा डॉ. विमल मुंदडांकडे जास्तच उठबस असे. त्यामुळे त्यांचा मुलगा आणि सुनासोबत फोटो हा कौटुंबिक स्नेहाचा भाग असल्याचे मुंदडा समर्थक सांगतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com