sayaji shinde praises Uddhav Thakares decision on Aare car shed | Sarkarnama

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या 'त्या' निर्णयाचे सयाजी शिंदेंकडून कौतुक

उर्मिला देठे 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

आरेमध्ये येणार्‍या प्रत्येकाने आता किमान 5 झाडे घेऊन यावे

  - सयाजी शिंदें

मुंबई :   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडला दिलेल्या स्थगितीबद्दल वृक्षप्रेमी अभिनेते सयाजी शिंदे यांनी ठाकरे यांच्या निर्णयाचे अभिनंदन केले. पुढील आदेशापर्यंत आरे कॉलनीतील एक पानही तोडू देणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. 

या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. मुख्यमंत्र्यांचे कौतुक करतानाच सयाजी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना आरे मधील वृक्ष लागवडीच्या मोहिमेला सहकार्य करण्याविषयी अपेक्षा व्यक्त केली आहे. शिवाय आरेमध्ये येणार्‍या प्रत्येकाने आता किमान 5 झाडे घेऊन यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

आरेमध्ये कारशेड व्हावे किंवा न व्हावे, मेट्रो व्हावी की नाही हा शासनाचा निर्णय आहे. पण विकासाच्या नावाखाली झाडे तोडली जाऊ नयेत. उद्धव ठाकरे यांच्या आरे कॉलनीतील एक पानही तोडू देणार नाही, या विधानाचे आम्ही महाराष्ट्रातील वृक्षप्रेमी स्वागत करतो.

आरे कॉलनीत आम्ही दर रविवारी झाडे लावण्यासाठी जातो. ज्यांना ज्यांना या कामात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी दर रविवारी स्वत:ची 5 झाडे घेऊन आरे कॉलनीत यावे असे आवाहन सयाजी शिंदे यांनी  यावेळी मुंबईकरांना केले आहे.

आरे कॉलनी ज्या खात्याअंतर्गत येते त्यांनी आणि महापालिकेने आम्हाला सहकार्य करावे. आरे प्लॅस्टिकमुक्त आणि देशा झाडांनीयुक्त करायचे आहे. त्यासाठी आपल्याला सहकार्य हवे आहे. महाराष्ट्रात देशी झाडे लावायची आहेत, त्याची सुरुवात आरेपासून करु, असे सयाजी शिंदे म्हणाले.

फडणवीस सरकारच्या काळात तत्कालिन वनमंत्री असलेल्या सुधीर मुनगुंटीवार यांच्या 33 कोटी वृक्ष लागवडीबाबत सयाजी शिंदे यांनी शंका उपस्थित केली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख