सावित्रीबाई फुले : दलित, वंचित, बहुजनांचा बुलंद आवाज ! 

क्रांतीजोती सावित्रीबाई फुले, महात्मा जोतीराव फुले आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा ज्यांच्या जगण्याचा श्वास राहिला. ज्यांच्या नसा नसात बंडखोरी आहे आणि दलित, वंचित समाजासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पित केले अशा उत्तरप्रदेशातील फायरब्रॅंड खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपला अखेर रामराम केला. खरेतर आज त्यांनी राजीनामा दिला नसता तरी भविष्यातही त्या भाजपसारख्या उजव्या पक्षात दीर्घकाळ रमल्या असत्या असे वाटत नाही.
सावित्रीबाई फुले : दलित, वंचित, बहुजनांचा बुलंद आवाज ! 

ज्यांची वैचारिक बैठकच पक्की झालेली असते ती कदापी बदलने शक्‍यही नसते. शाहू फुले आंबेडकर यांना आदर्श मानणारी उत्तरप्रदेशातील ही रणरागिणी उजवीकडे वळलीच कशी हा प्रश्‍न तेथील जनतेला नेहमीच पडला. सावित्रीबाईंचा जीवनसंघर्ष थक्क करणारा आहे. सावित्रीबाईचा चेहरा देशातील महिलांना प्रेरणा देणारा आहे. 

उत्तरप्रदेशातील बहराईच जिल्ह्यातील हुसेनपूर मृदांगी या खेड्यात सावित्रीबाईंचा जन्म 1981 मध्ये झाला. त्यांचे वडील अग्याराम हे रेल्वे कर्मचारी तर आई मायावती या गृहीणी. त्यांना तीन बहिनी आणि दोन भाऊ आहेत. सावित्रीबाईंचा विवाह सहाव्या वर्षी करण्यात आला होता. मात्र त्या माहेरीच होत्या. गरीबीचे चटके सहन केलेल्या या बंडखोर मुलीला समाजसेवेची खूपच आवड होती. आपण काही तरी समाजासाठी केले पाहिजे असे वाटत होते. 

1995 मध्ये एका आंदोलनात सावित्रीबाई सहभागी झाल्या आणि त्यांना तुरूंगात जावे लागले. तुरूंगात गेल्यानंतर या मुलीने ठरविले की यापुढे संसारात रमायचे नाही. सार्वजनिक जीवनातच काम करायचे. तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी थेट घर गाठले.जवळच्या नातेवाईकांशी चर्चा केली आणि आपल्या लहान बहिणीचे लग्न आपल्या पतीशी करून देण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी त्यांच्या खऱ्या जीवनाला सुरवात झाली. 

या कुटुंबाचा आदर्श होते बीएसपीचे दिवंगत नेते कांशीराम. पुढे झालेही तसेच त्या बसपमध्ये दाखल झाल्या. छोटीमोठी आंदोलने आणि राजकारण हा त्यांच्या जीवनाचा एक भागच बनून गेला. लग्न न करता त्या साध्वी बनल्या. बौद्ध भिकूंचा त्यागाचा भगवा रंग अंगावर घेतला.जनसेवा आश्रमाच्या माध्यमातून गरीबांचे अश्रू पुसण्याचे कार्य सुरू केले. 

सावित्रीदेवींच्या सावित्रीबाई फुले बनल्या 
सावित्रीबाईच्या वडीलांचे मित्र आणि दलितांच्या हक्कासाठी लढणारे अक्षयनाथ कनोजा यांनी सावित्रीबाईंना दत्तक देण्याची विनंती केली. पुढे त्या कनोजाच्या कन्या बनल्या. कनोजा हेच त्यांचे फादर, गाईड आणि गुरू बनले. सावित्रीबाईंचे पूर्वीचे नाव सावित्रीदेवी होते.पण, कनोजा यांनी त्यांचे नाव सावित्रीबाई फुले असे केले. महाराष्ट्रातील क्रांतीजोती सावित्रीबाई फुले या कनोजा यांचा आदर्श होत्या. अशा रितीने त्या सावित्रीदेवींच्या सावित्रीबाई बनल्या. 

मायवतींशी संघर्ष 
भाजपत येण्यापूर्वी सावित्रीबाई बसपत होत्या. त्यांनी एकदा रॅली काढली आणि शक्तीप्रदर्शनही केले. या रॅलीत काही मंडळीनी घोषणा दिल्या की जर मायावती मुख्यमंत्री बनू शकतात तर सावित्रीबाई का नाही. मायावतींना हे रूचले नाही. शेवटी मतभेद होऊन त्या पक्षाबाहेर फेकल्या गेल्या. मायावती या त्यांच्या आदर्श होत्या. सावित्रीबाईच्या आईचे नावही मायावती होते. मात्र मातेसमान असणाऱ्या दुसऱ्या आईशी त्यांचे काही जमले नाही. पुढे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

निवडणुकीच्या मैदानात 
सावित्रीबाईंनी पहिली निवडणूक पंचायत समितीची लढविली. ती जिंकलीही. पुढे 2012 मध्ये भाजपने त्यांना बलहा विधानसभा मतदारसंघातून उभे केले. तीन वर्षे आमदार राहिल्यानंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदींचे वादळ देशात आले. मोदी त्यांना ओळखत होते. यापूर्वी त्यांनी गुजरातचे दौरेही केले होते. मोदींनी त्यांना गुजरातमधून लढण्याची विनंती केली होती. पण, त्यांना आपल्या कर्मभूमीतूनच लढायचे होते. 2014 मध्ये त्या बहराईच लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या. साध्वी सावित्रीबाई गेल्या चार वर्षापासून भाजपच्या खासदार आहेत. 

देशात मोदींची सत्ता आल्यानंतर बरेच राजकारण घडले. गुजरातसह देशभरात दलितांवरील अन्याय वाढले. हे सावित्रीबाईंना सहन झाले नाही. या अन्याय आणि अत्याचाराविरोधात त्यांनी आवाज बुलंद केला. आपण सत्ताधारी आहोत म्हणून त्या गप्प बसल्या नाहीत. त्यांनी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. दलितांवरील अन्याय त्यांना सहन होणे शक्‍यही नव्हते. भाजपमध्ये राममंदिरावरून सुरू असलेले राजकारण त्यांना रुचले नाही. असे असले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदींवर त्यांचा आजही खूप विश्वास आहे. 

सावित्रीबाई सांगतात, बहराई हा राखीव मतदारसंघ आहे. या मतदारसंघात बहुसंख्य दलित आणि बहुजन समाज आहे. त्यांच्या मतांवर मी निवडून आले आहे. दलित आणि बहुजन हक्कासाठी मी पुढेही लढत राहणार आहे. त्या आमदार, खासदार तर बनल्याच पण, मुख्यमंत्री होण्याचे त्यांचे स्वप्न लपून राहिले नाही. याविषयी सावित्रीबाई म्हणतात, "" जर लोकांनी ठरविले तर मी उत्तरप्रदेशची मुख्यमंत्रीही बनू शकते.'' 

राम मंदिराच्या मुद्द्यावरुन फुले यांनी भाजपावर टीका केली होती. राम मंदिर हे मंदिर नसून देशातील तीन टक्के ब्राह्मणांच्या कमाईसाठीचा धंदा आहे, असा गंभीर आरोप केला होता. तसेच भगवान राम हे शक्तीहीन आहेत. त्यांच्यात शक्ती असते तर अयोध्यामध्ये तेव्हाच राम मंदिर उभारले असते, असेही सावित्रीबाईंचे म्हणणे आहे. 

त्याचबरोबर भगवान हनुमान हे मनुवादी लोकांचे गुलाम होते, असेही म्हटले होते. राम हे मनुवादी होते. जर हनुमान दलित नसते तर त्यांना मनुष्य का बनवण्यात आले नाही ? त्यांना वानरच का केले ? त्यांचा चेहरा काळा का केला, अशा प्रश्नांची सरबत्तीच केली होती. 

तत्पूर्वी आरक्षणाच्या मुद्यावरुनही त्यांनी भाजपाला घेरले होते. मी भाजपाची नव्हे तर दलिताची मुलगी आहे. आरक्षण संपवण्याचा कट रचला जात आहे. मी जर खासदार झाले नसते तर भाजपला बहराईच मतदारसंघ राखता आला नसता. भाजपला नाईलाज होता. त्यांना विजय मिळवून देणारा उमेदवार हवा होता. त्यामुळे त्यांनी मला तिकीट दिले. मी त्यांची गुलाम नाही. खासदार होऊनही जर मी माझ्या लोकांसाठी बोलू शकत नसेल तर काय फायदा, असा सवाल त्यांनी केला आहे. पाहू या पुढे काय होते ते ! 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com