...थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली तर "त्यांची' हत्तीवरून मिरवणूक काढू - सत्यजित कदम

 ...थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली तर "त्यांची' हत्तीवरून मिरवणूक काढू - सत्यजित कदम

कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी शहरासाठीची थेट पाईपलाईन योजना पूर्ण झाली तर ती पूर्ण करणाऱ्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे आव्हान महापालिकेतील ताराराणी आघाडीचे गटनेते नगरसेवक सत्यजित कदम यांनी पत्रकार परिषदेत दिले. ही योजना पूर्ण झाली तर भाजपा-ताराराणी आघाडी महापालिका निवडणूक लढवणार नाही, पण योजना पूर्ण झाली नाही तर त्यांनीही तशी तयारी दाखवावी, असे आव्हान विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी यांनी दिले. 

दरम्यान, या योजनेच्या कामाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करणार असून त्यासाठी त्यांच्या भेटीची वेळही मागणार असल्याचे कदम, सुर्यवंशी यांनी सांगितले. माजी खासदार धनंजय महाडिक यांनी योजनेविषयी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर होत असलेल्या टिकेला आज श्री. कदम, श्री. सुर्यवंशी यांच्यासह विरोधी आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. 

श्री. सुर्यवंशी म्हणाले," माजी खासदार महाडिक यांनी ही योजना आम्ही पूर्ण करू एवढेच म्हटले, त्यावर टीका होणे योग्य नाही. त्यांचा संबंध काय विचारणाऱ्यांना ते माजी खासदार आहेत, या शहराचे नागरिक आहेत याची तरी जाण आहे का नाही ? मुळात ही योजना फसवी आहे, कोणत्याही विभागाची ना - हरकत न घेता ती शहरवासियांच्या माथी मारली. पण आम्ही यात राजकारण केले नाही. भाजपाच्या सत्तेच्या काळात तत्कालिन पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार अमल महाडिक यांनी या योजनेसाठी सर्व विभागांचे ना -हरकत मिळवून दिले. काल ज्या बहुमजली पार्किंगचे पायाभरणी झाले त्याचा निधी भाजपाच्या काळातच मंजूर झाला. त्यांनी अशा योजनांचे खुशाल नारळ फोडावेत. 

श्री. कदम म्हणाले,"बास्केट ब्रीजची चेष्टा केली पण ते काम मंजूर आहे, निविदा ऑनलाईन जाऊन बघितली तर त्यात ते दिसेल. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे हे काम झालेले नाही. थेट पाईप लाईन योजनेतून जनतेची फसवणूक झाली आहे, त्यावर बोलण्याचा अधिकार श्री. महाडिक यांना का नाही ? त्यांना जनतेने नाकारले हे मान्य आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते म्हणून ते दाढी वाढवून फिरलेले नाहीत, दुसऱ्या दिवसांपासून त्यांनी कामाला सुरूवात केली आहे. गेली पाच महिने योजनेचे काम बंद आहे. या योजनेचा कन्सल्टंट आणि ठेकेदार एकदाही समोर येत नाही.' 

माजी महापौर सुनील कदम म्हणाले,"अपुरी योजना लोकांच्या माथी मारली गेली आहे. ज्या सत्ताधाऱ्यांनी ही योजना आणली त्यांनीच यात मोठा "आंबा' पाडला आहे. हा विषय कोल्हापुरच्या जनतेच्या जिव्हाळ्याचा आहे, म्हणून आम्ही उठसुठ आरोप करत बसत नाही. ही योजना मार्गी लावावी यासाठीच पाठपुरावा करत आलो. यासंदर्भात दोन्हीही मंत्र्यांनी माझ्यासमोर येऊन चर्चा करावी व माझ्या प्रश्‍नांची उत्तरे द्यावीत. नगरसेवकांवर दबाव आणून टोलप्रमाणेच ही योजना माथी मारली आहे. या प्रश्‍नावरही जनतेने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे.' यावेळी नगरसेवक आशिष ढवळे, राजसिंह शेळके, किरण नकाते, ईश्‍वर परमार, शेखर कुसाळे, रूपाराणी निकम आदि उपस्थित होते. 

ए. वाय. कोण ? 
या योजनेसाठी ए. वाय. पाटील यांच्या पाया पडतो असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात, मुळात हे ए. वाय. कोण ? एखाद्याला योजना थांबवण्याची सुपारीच दिली होती का की आंबा पाडण्यासाठीच हा खोडा घालण्यात आला, याचा खुलासा करण्याची मागणी श्री. कदम यांनी केली. 

आर. के. यांना लाज कशी नाही 
थेट पाईपलाईनबद्दल बोलणाऱ्या श्री. महाडिक यांना हे महाडिक कोण ? म्हणणाऱ्या आर. के. पोवार यांना लाज वाटली पाहिजे. याच महाडिकांनी इतरांचा विरोध डावलून तुम्हाला महापौर केले, याची तरी किमान जाण ठेवा, असा टोला श्री. कदम यांनी लगावला. 

कृती समितीला दिसत नाही का ? 
शहरातील विविध प्रश्‍नावर कृती समिती आवाज उठवते. आर. के. त्याचे निमंत्रक आहेत, त्यांनी टोल घालवण्यासाठी सर्वांना एकत्र केले. पण याच कृती समितीने थेट पाईपलाईनबद्दल कधी महापालिकेला विचारणा केली नाही की या योजनेच्या कामातील गैरव्यवहारावर कधी आंदोलन का केले नाही ? असा सवाल सुनील कदम यांनी उपस्थित केला. 

महापौरांना शोभत नाही 
महापौर निलोफर आजरेकर यांनी श्री. महाडिक यांच्यावर केलेली टीका त्यांना शोभत नाही. अनेक विकासाची कामे प्रलंबित आहेत, महिलांना आरक्षणातून त्यांना ही संधी मिळाली आहे, त्यांनी कामातून आपले कर्तृत्व सिध्द करावे, टीका करताना थोडा विचार करावा, असा सल्ला रूपाराणी निकम यांनी दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com