सत्यपाल मलिक : सत्तेची मस्ती 

सत्यपाल मलिक : सत्तेची मस्ती 

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन:श्‍च एकवार पूर्ण बहुमत मिळाल्याची नशा त्या पक्षाच्या नेत्यांना कशी चढली आहे, याचेच उदाहरण जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आपल्या बेलगाम वक्‍तव्याने दाखवून दिले आहे.

"अतिरेकी आणि दहशतवादी यांनी आपल्या हातातील बंदुकांनी पोलिस तसेच सुरक्षा दलातील निष्पाप जवान तसेच अधिकारी यांचे बळी घेण्याऐवजी त्यांनी या राज्याची लूट करणाऱ्या भ्रष्ट राजकारण्यांना ठार मारावे!' असे जाज्ज्वल्य उद्‌गार या मलिक साहेबांनी एका जाहीर सभेत काढल्यावर वादळ उठणे, हे साहजिकच होते. मात्र, आपल्या भाषणात ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर "या लोकांनी कधी या राज्याची लूट करणाऱ्यांना ठार मारले आहे काय,' असा सवालही त्यांनी केला.

कारगिल विजयदिनाच्या द्विदशकी वर्धापन सोहळ्यात बोलताना मलिक यांनी केलेला हा सवाल म्हणजे थेट दहशतवाद्यांना चिथावणी देण्याचाच प्रकार होता. मलिक यांच्या या धक्‍कादायक उद्‌गारांची संतप्त प्रतिक्रिया उमटली आणि त्यानंतर ते खुलासा करणार, हेही अपेक्षितच होते. मात्र, अवघ्या काही वर्षांपूर्वीपर्यंत भाजपचे "महनीय नेते' म्हणून समाजात वावरत असलेल्या मलिक यांना किमान आपण भूषवत असलेल्या राज्यपालपदाचे तरी भान ठेवायला हवे होते. 

आता मलिक यांना वास्तवाचे भान आल्यामुळे "आपण हे उद्‌गार संताप तसेच नैराश्‍य यांच्यापोटी काढले!' असा खुलासा ते करू पाहत आहेत. मात्र, या खुलाशामुळे या वादावर पडदा पडणे शक्‍य नाही. त्याचे कारण म्हणजे हे उद्‌गार काढण्याच्या आदल्याच दिवशी त्यांनी "काश्‍मीरमधील बड्या घराण्यांनी सार्वजनिक पैशांचा मोठ्या प्रमाणावर अपहार केल्याचा आरोप केला होता. या बड्या घराण्यातील लोकांची श्रीनगर, दिल्ली तसेच दुबई येथे आलीशान निवासस्थाने आहेत आणि त्यामुळे त्यांनी कसा भ्रष्टाचार केला तेच स्पष्ट होते, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे काश्‍मीरमधील ही "बडी घराणी' हेच त्यांच्या कारगिल विजयदिनाच्या भाषणातील "लक्ष्य' असल्याचे सहजपणे म्हणता येते.

मलिक यांच्या या वक्‍तव्यानंतर जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री यांनी ट्‌विटरद्वारे अत्यंत संतप्त प्रतिक्रिया व्यक्‍त केली असून, आपले हे ट्‌वीट जपून ठेवण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे. "यापुढे कोणीही राजकारणी वा सनदी अधिकारी अतिरेक्‍यांच्या गोळ्यांना बळी पडला, तर त्याने ते कृत्य राज्यपालसाहेबांच्या या आदेशानुसारच केल्याचा अर्थ सहज काढता येईल,' असे ओमर यांचे हे ट्‌वीट आहे आणि त्यात तथ्य आहे. खरे तर मलिक यांची या बेताल वक्‍तव्याबद्दल या पदावरून उचलबांगडीच व्हायला हवी. मात्र, त्यांना किमान समज देण्याचे काम तरी भाजपचा कोणी बडा नेता करणार आहे काय? 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com