पक्षप्रमुखांच्या आदेशावरून सत्तार-खैरे वादावर अन्य नेत्यांचीही गुपचिळी

 पक्षप्रमुखांच्या आदेशावरून सत्तार-खैरे वादावर अन्य नेत्यांचीही गुपचिळी

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षपदावरून घडलेले नाट्य, त्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यात झालेला जोरदार वाद आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी केलेला जालीम उपाय यामुळे सध्या या विषयावर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मौन धारण केले आहे. मातोश्रीवर झालेली बैठक वादळी झाली अशी माहिती असली तरी याबद्दल चक्कार शब्द बाहेर काढायचा नाही अशी तंबी मिळाल्याने "ऑल इज वेल'चा आव शिवसेनेकडून आणला जात आहे. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत डोणगांवकरांना बंड करायला लावून सत्तार यांनी केलेली खेळी शिवसेनेच्याच अंगलट आली होती. ईश्‍वर चिठ्ठीने महाविकास आघाडीच्या मीना शेळके अध्यक्ष झाल्यामुळे स्थानिक नेत्यांचा जीव भांड्यात पडला होता. पण उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला. 
त्यातूनच खैरे यांनी सत्तार यांच्यावर तोफ डागत त्यांना गद्दार ठरवले. उध्दव ठाकरेंनी त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नये असे आवाहन देखील खैरेंनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केले होते. प्रत्यक्षात उध्दव ठाकरे यांनी खैरे, दानवे, सत्तार यांना मातोश्रीवर बोलवून या वादावर पडदा टाकला. मात्र हे सहज घडले नाही, तर या बैठकीत ठाकरेंनी आपल्या भाषेत सगळ्यांनाच समज दिल्याचे बोलले जाते. 

सत्तारांना सांगितले गप्प बसा ? 
शिवसेनेत दाखल झाल्यापासून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईपर्यंत आणि त्यानंतर मंत्रिमंडळ समावेशाच्या प्रक्रियेदरम्यान, अब्दुल सत्तार वारंवार प्रसार माध्यमांशी मुक्तपणाने संवाद साधत होते. अगदी सरकार स्थापनेच्या वेळी उध्दव ठाकरे यांनी शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना आधार कार्ड, पाच-सहा दिवस पुरतील एवढे कपडे घेऊन मुंबईत बोलवले असल्याचा गौप्यस्फोट देखील सत्तारांनी केला. त्यामुळे राज्यभर याची चर्चा चांगलीच रंगली होती. 

याशिवाय सातत्याने चॅनलवर बाईट देत पक्षाचे प्रवक्ते असल्याच्या थाटात सत्तार भूमिका मांडतांना दिसत होते. तेव्हाच सत्तार यांना पक्षनेतृत्वाने समज दिल्याची चर्चा होती. त्यानंतर काहीकाळ शांत राहिलेले सत्तार पुन्हा ऍक्‍शन मोडमध्ये आले होते. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी सत्तार यांच्या राजीनाम्याच्या पसरलेल्या बातम्या हा देखील त्यांच्या खेळीचाच भाग होता असे बोलले जाते. एकंदरित सत्तार यांची कार्यपध्दती पाहता यापुढे पक्ष किंवा सरकारच्या धोरणांबद्दल आपण प्रसारमाध्यमांशी बोलूच नये अशी सूचना देखील सत्तारांना मातोश्रीच्या बैठकीत दिल्याचे समजते. 

मुंबईत झालेल्या बैठकीनंतर सत्तार-खैरे-दानवे यांची "हम साथ साथ है' ची छबी प्रसार माध्यमांवर झळकली. आता हे चित्र किती दिवस कायम राहील याबद्दल राजकीय वर्तुळातूनच शंका उपस्थित केली जात आहे. वाद मिटला आता आम्ही एकत्रित काम करणार असे सांगत शिवसेनेचे स्थानिक नेते मुंबईतील बैठकीवर जास्त बोलणे टाळत आहे. उध्दव ठाकरे यांचा दोन दिवसांचा औरंगाबाद दौरा हे त्यामागचे खरे कारण असल्याचे बोलले जाते. शिवाय मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असलेल्या विरोधीपक्ष भाजपला कुठलीही संधी यापुढे मिळू नये यासाठी देखील पक्षातंर्गत वादावर यापुढे जाहीर वाच्यता न करता ते चार भितींतच मिटवावेत अशी महत्वाची सूचनाही मुंबईतील बैठकीत स्थानिक नेत्यांना देण्यात आल्याची चर्चा आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com