मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावरून भाजप कायकर्ते-सत्तार समर्थक आमने सामने

 मुख्यमंत्र्यांच्या स्वागतावरून भाजप कायकर्ते-सत्तार समर्थक आमने सामने

औरंगाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा 28 ऑगस्ट रोजी सिल्लोडमध्ये येत आहे. भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे आमदार अब्दुल सत्तार यांचे समर्थक देखील मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहेत. आता एकाच चौकात मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यावरून सत्तार समर्थक व भाजप कार्यकर्ते इरेला पेटल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सिल्लोडमध्ये दाखल होण्याआधीच आमदार अब्दुल सत्तार समर्थक व भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. शहरातील प्रियदर्शनी चौकात मुख्यमंत्र्यांचे स्वागत आम्हीच करणार असा हट्ट दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांनी धरल्याने आता पोलिस प्रशासन दोघांचीही समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. बुधवारी (ता.28) महाजनादेश यात्रा सिल्लोड तालुक्‍यात दाखल होत आहे. या निमित्ताने दुचाकी वाहन रॅली काढण्याचे नियोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. त्यानंतर प्रियदर्शनी चौकात मुख्यमंत्र्यांचे स्वागत आणि छोटीशी सभा घेण्यात येणार आहे. भाजप पदाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार आमचा हा कार्यक्रम वीस दिवसांपूर्वीच ठरलेला होता. यासाठी आम्ही नगरपालिकेकडे रितसर परवानगी मिळण्यासाठी अर्ज देखील दिला. 

पण नगरपालिका सत्तार यांच्या ताब्यात असल्याने त्यांनी सत्तेचा दुरूपयोग करत आम्हाला परवानगी नाकारली आणि ही जागा स्वतःसाठी मिळवून घेतली असा दावा भाजपकडून केला जातोय. एकाचवेळी एकाच ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा सत्कार दोघांना करणे कसे शक्‍य आहे. सत्तार समर्थक आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रियदर्शनी चौकात जमा झाले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे सत्तार समर्थक आणि भाजप कार्यकर्ते प्रियदर्शनी चौकातच मुख्यमंत्र्यांचे स्वागत करणार यावर अडून बसले आहेत. पोलीसांनी आमदार अब्दुल सत्तार आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून यातून योग्य मार्ग काढण्याचे प्रयत्न चालवले आहेत. अब्दुल सत्तार यांचा महाजनादेश यात्रेदरम्यानच, भाजपमध्ये प्रवेश होणार अशा चर्चांना उधाण आलेले आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या स्वागताचे बॅनर सत्तार मित्रमंडळाच्या वतीने संपूर्ण सिल्लोड शहरात लावण्यात आले आहेत. दुसरीकडे भाजपने मात्र सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची शक्‍यता फेटाळून लावत आपला विरोध कायम ठेवला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com