प्रवेश रोखल्याबद्दल धन्यवाद , सत्तार समर्थकांकडून भाजपला टोमणेबाजी

 प्रवेश रोखल्याबद्दल धन्यवाद , सत्तार समर्थकांकडून भाजपला टोमणेबाजी

औरंगाबाद : " भाजप प्रवेश रोखल्याबद्दल धन्यवाद, आमचा नेता लयी नशिबवान ' अशी शेरेबाजी करत शिवसेना आमदार अब्दुल सत्तार समर्थकांनी भाजपला टोला लगावला आहे. राज्यातील सत्ता संघर्षात शिवसेना उजवी ठरत असल्याने सत्तार समर्थकांनी भाजपला सुनावण्याची संधी हेरत सोशल मिडियावर शेरेबाजी सुरू केली आहे. 
निवडणुकीूर्वी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला तेथील स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानंतर सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करत सिल्लोडची जागा भाजपकडून हिसकावून घेतली. तालुक्‍यातील सर्वपक्षीय नेते एकत्रित आल्यानंतरही सत्तार यांनी विरोधकांना धूळ चारत विजय मिळवला होता. 

दरम्यान, सत्ता स्थापनेवरून राज्यात शिवसेना-भाजप यांच्यात संघर्ष उडाला असून शिवसेनेने केंद्रातील सत्तेतून बाहेर पडत राज्यात राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे. सिल्लोडचे शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्या संभाव्य मंत्रीमंडळात समावेश होण्याची शक्‍यता पाहता त्यांच्या समर्थकांनी भाजपला धन्यवाद देत एकप्रकारे डिवचले आहे. निवडणुकीपूर्वी सत्तार यांनी भाजपमध्ये प्रवेश मिळावा यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. 

भाजपच्या स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी टोकाची भूमिका घेत सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला विरोध केला होता. मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रत्यक्ष भेटून तसेच निवेदन देत सत्तार यांचा भाजप प्रवेश रोखण्यात त्यांना यश आले होते. पण सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश करत भाजपवर कुरघोडी केली होती. त्यानंतरही तालुक्‍यातील अडीचशेहून अधिक भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन सत्तार यांच्या विरोधात अपक्ष प्रभाकर पालोदकर यांच्या पाठीशी सगळी शक्ती उभी केली होती. पण या सगळ्यांवर मात करत सत्तार यांनी विजयाची हॅटट्रीक साधली. 

सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर सत्तार समर्थकांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून भाजपला टोला लगावण्यास सुरूवात केली आहे. सत्तार यांच्या भाजप प्रवेशाला त्यावेळी विरोध केल्याबद्दल स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांचे धन्यवाद सत्तार समर्थक मानत आहेत. शिवाय आमचा नेता नशीबवान आहे, म्हणूनच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला नाही असा टोला देखील त्यांच्याकडून लगावला जात आहे. 

त्यावेळी सत्तारांच्या भाजप प्रवेशाला विरोध झाला नसता, तर आज सत्तार यांची मंत्रीपदाची संधी हुकली असती हेच त्यांच्या समर्थकांना बहुदा सुचवायचे आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com