नितेश राणेंचे प्रतिस्पर्धी सतीश सावंतांनी मागितले पोलिस संरक्षण

निवडणूक काळात राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून भीतीदायक वातावरण निर्माण केले जात आहे.-सतीश सावंत
sawant -Rane
sawant -Rane

कणकवली : कणकवली विधानसभा मतदारसंघात माझ्या विरोधातील भाजपचे उमेदवार नीतेश राणे यांच्याकडून माझ्यावर खोटे नाटे आरोप केले जात आहेत. चुकीच्या आणि बेकायदेशीर तक्रारी करून मला गोवण्याची शक्‍यता आहे.

गेल्या काही दिवसांत स्वाभिमान पक्ष सोडल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांना नीतेश राणेंकडून सुरू असलेली दमदाटी आणि दडपशाहीचे प्रकार पाहता माझ्या जीवितास धोका आहे. यामुळे पोलिस संरक्षण मिळावे, अशी मागणी करणारा अर्ज शिवसेना उमेदवार सतीश सावंत यांनी पोलिस अधीक्षकांकडे केला आहे.


माझ्याबद्दल बॅंक कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रकार वैभववाडीतील घटनेत दिसून आला आहे. हे नीतेश राणेंचे बेकायदेशीर आणि निंदनीय कृत्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे, की आपण स्वाभिमान पक्षात कार्यरत होतो. 3 सप्टेंबरला नीतेश राणेंनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने त्यांना उमेदवारी दिली. याच दरम्यान काही तात्त्विक मतभेद झाल्याने मी "स्वाभिमान'चा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. 

शिवसेनेने मला कणकवली विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी दिली आहे. माझा झालेला शिवसेना प्रवेश आणि प्रचारादरम्यान होत असलेल्या सभा पाहून नीतेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना माझ्याबद्दल राग निर्माण झाला आहे. त्याचे अनुभव राणे यांच्याकडून होणाऱ्या कार्यकर्त्यांना दमदाटी, दडपशाहीतून येत आहेत. 10 दिवसांत उमटणाऱ्या प्रतिक्रिया पाहता माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. 

मी जिल्हा बॅंक अध्यक्ष असल्याने बॅंक कर्मचारी, अधिकाऱ्यांना माझ्याबाबत ते धमक्‍या देत आहेत. बॅंकेच्या नियमित कामात हस्तक्षेप करत असल्याची घटना वैभववाडीत 11 ऑक्‍टोबरला घडली आहे. त्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. माझे कौटुंबिक जीवन पाहता मी सर्वसामान्य नागरिक आहे.

सद्यस्थितीत निर्माण झालेले वातावरण माझ्या जीविताला भय निर्माण करणारे आहे. त्यामुळे वरील परिस्थितीचा विचार करून निवडणुकीच्या काळात प्रचार दौऱ्यांचा, प्रचार सभांचा विचार करता योग्य ती चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. पोलिस खात्यामार्फत संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे सावंत यांनी केली आहे.

"दगाफटका होण्याची भीती'
सावंत यांनी तक्रारीत म्हटले आहे, की निवडणूक काळात राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून भीतीदायक वातावरण निर्माण केले जात आहे. नारायण राणे यांच्या समवेत अनेक वर्षे मी राजकीय काम केले आहे. त्यामुळे माझाही दांडगा लोकसंपर्क पाहता विरोधी भाजप उमेदवार राणे यांच्या मनात राग निर्माण झाला आहे. यामुळे मला कुठूनही कोणामार्फत दगाफटका करण्याची शक्‍यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com