जिवंंत असेपर्यंत काकडे गट अजितदादांच्या मागे : सतिश काकडे

जिवंंत असेपर्यंत काकडे गट अजितदादांच्या मागे : सतिश काकडे

सोमेश्वरनगर : ``अजितदादा, 1965-67 पासूनच्या वादाला मी पूर्णविराम देतो. जिवंत असेपर्यंत सगळ्या निवडणुकांमध्ये काकडे गट तुमच्याबरोबर एकनिष्ठ राहील. विधानसभेला विरोधी उमेदवाराची अनामत जप्त करू, अशा शब्दात सतीश काकडे यांनी दोन पिढ्यांचा काकडे-पवार वाद संपविला.

अजित पवार यांनीही, विचार वेगळे असले तरी विरोधात लढून वेळ घालविण्यापेक्षा विकासाला वेळ देऊ. तुमच्या विश्वासाला जागून आगीतून फुफाट्यात असे होऊ देणार नाही, अशा शब्दात आश्वस्त करत धन्यवादही दिले.


निंबुत (ता. बारामती) येथे ग्रामसचिवालासह सुमारे अडीच कोटी रूपयांच्या विविध सोळा विकासकामांची उद्घाटने पवार यांच्या हस्ते झाली. पवारांची जंगी फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी पार पडलेल्या सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शामकाका काकडे होते.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, 'सोमेश्वर'चे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, 'छत्रपती'चे अध्यक्ष प्रशांत काटे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विजय कोलते, प्रवीण माने, शहाजी काकडे, राजवर्धन शिंदे, संभाजी होळकर, बाळासाहेब सोळसकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी उद्योजक आर. एन. शिंदे, ज्युबिंलटचे उपाध्यक्ष सतीश भट, दिलीप फरांदे, बाबा फरांदे, धनंजय काकडे आदींचा मदतकार्याबद्दल सत्कार करण्यात आला. 

पवार म्हणाले, मी निंबुतला 1991 पासून फारच कमी वेळा आलो. पण आज सगळी कसर भरून निघाली. निंबुतमधील कामे दर्जेदार आहेत. यापुढेही मदत करणार. सतीशरावांच्या निर्णयाबद्दल मनापासून आभार मानतो. आपले नेते आणि विचार काहीसे वेगळे असले तरी परिसराचा विकास हेच ध्येय आहे. शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा ही अपेक्षा आहे. काकडे कुटुंबिय त्यासाठी काम करत आले. त्याकरता कशाला विरोध करायचा?

राज्यातही समविचारी पक्षांना घेऊन जातीयवादी पक्षाला बाहेर ठेवायचे आहे. मोदींनी सगळे शब्द फिरविले. राज्यातील राम शिंदे, रावसाहेब दानवे, विनोद तावडे, प्रकाश जावडेकर हे घाणेरडी वक्तव्य करतात. त्यांना सत्तेचा माज आला आहे. लोकांच्या सुखदुःखाशी घेणे देणे नाही. जातीजातीत भांडण लावतात. हनुमानाचीही जात काढतात. पाच राज्यातील निकालांनी त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, अशी टीका अजितदादांनी केली.

सतीश काकडे म्हणाले, आमच्या घरातल्या सर्वांशी बोलूनच काकडे-पवार वाद संपवत आहे. माझा गटही आमदारकी, खासदारकी, जिल्हा परिषद आदी सर्व निवडणुकांमध्ये अजितदादांबरोबर राहील. तुम्ही मुख्यमंत्री व्हा. मी पाठीत खंजीर खुपसणार नाही. विरोधक असूनही तुम्ही आम्हाला विकासात मदत करून मने जिंकली. मला पद नको मात्र शेतकऱ्यांचे भांडण तुमच्याविरोधात घेऊन येऊ शकतो. मात्र, तुम्ही ही वेळ येऊ देणार नाही. बाबालाल काकडे यांच्या मनातही तुमच्याबद्दल चांगले मत होते. मात्र, शेतकरी कृती समिती मोडणार नाही. राजू शेट्टींसोबत काम करत राहणार पण निवडणुकीत तुमच्याचबरोबर राहणार. सरपंच राजकुमार बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अच्युत शिंदे व मदन काकडे यांनी सूत्रसंचालन केले तर उपसरपंच उदय काकडे यांनी आभार मानले. 


 सोमेश्वरचे दावे मागे घेणार
कलम 88 अन्वयेचा दावा, शंभर रूपये प्रतिटनाचे थकीत पेमेंटचा दावा व अध्यक्षांविरूध्दचा मानहानीचा दावा असे सोमेश्वर कारखान्याच्या विरोधातील तीन दावे केवळ अजितदादांसाठी विनाशर्त काढून घेत आहे. 'सोमेश्वर' एकरकमी एफआरपी देऊ शकतो. अजितदादांनी चर्चेसाठी वेळ देऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे सतीश काकडे म्हणाले. यावर अजित पवार यांनी, पुढील आठ-दहा दिवसात बसून प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com