तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी सतीश चव्हाण लागले कामाला ...

तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी सतीश चव्हाण लागले कामाला ...

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या जून किंवा जुलै महिन्यात होण्याची शक्‍यता आहे. सलग दोनवेळा विजयी झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सतीश चव्हाण तिसऱ्यांदा मैदानात उतरण्याची शक्‍यता आहे. चव्हाण यांनी सध्या मराठवाड्यातील पदवीधर मतदारांच्या भेटीगाठीवर जोर देत तिसऱ्यांदा आमदार होण्यासाठी कंबर कसली आहे. 

कधीकाळी भाजपचे वर्चस्व असलेला मराठवाडा पदवीधर मतदारसंघ 2009 पासून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपल्या ताब्यात घेतला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी अनुक्रमे श्रीकात जोशी आणि शिरीष बोराळकर या भाजप उमेदवारांचा पराभव करत या मतदारसंघावर आपले वर्चस्व सिध्द केले होते. येत्या जून महिन्यात सतीश चव्हाण यांच्या आमदरकीची मुदत संपत आहे. नव्या पदवीधर मतदारांची नोंदणी पुर्ण केल्यानंतर आता विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांनी मतदारांच्या थेट भेटीवर भर देत अप्रत्यक्षरित्या प्रचाराला सुरूवात केली आहे. राज्यात नुकतेच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. 

राष्ट्रवादीकडून तिसऱ्यांदा सतीश चव्हाण यांनाच मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची उमेदवारी दिली जाणार असे बोलले जाते. उमेदवारी निश्‍चित असल्यामुळेच चव्हाण यांच्या संपर्क मोहिमेला सध्या वेग आल्याचे पहायला मिळते. राष्ट्रवादी हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखत हॅट्रीक साधण्याच्या प्रयत्नात आहे, तर दुसरीकडे भाजप हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेण्यासाठी उत्सूक आहे. 

सलग दोनवेळा मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्यामुळे सतीश चव्हाण यांचा आत्मविश्‍वास बळावलेला आहे. पदवीधरांचे अनेक प्रश्‍न सभागृहात मांडून ते सोडवण्यात देखील त्यांना बऱ्यापैकी यश मिळालेले आहे. शिवाय शैक्षणिक संस्थांचे मराठवाडाभरात असलेले जाळे, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून त्यांचा वाढलेला दांडगा जनसंपर्क ही सतीश चव्हाण यांच्यासाठी बलस्थाने मानली जातात. 

भाजपही लावणार जोर.. 
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ जिंकण्यासाठी भाजपने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. 2014 मध्ये पराभूत झालेले शिरीष बोराळकर यांना भाजपकडून दुसऱ्यांदा संधी दिली जाण्याची शक्‍यता आहे. पण त्यांना आपल्याच पक्षातील प्रवीण घुगे, किशोर शितोळे यांच्याशी उमेदवारीसाठी स्पर्धा करावी लागणार आहे. तीन्ही उमेदवारांना तयारीला लागा असे आदेश पक्षश्रेष्ठींकडून आल्यामुळे शेवटच्या क्षणी उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडते यावर लढत कशी रंगणार हे ठरणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com