अशोक चव्हाणांवर शाईफेक प्रकरणी निलंबित सतिश चतुर्वेदींना थोरातांचा दिलासा

अशोक चव्हाणांवर शाईफेक प्रकरणी निलंबित सतिश चतुर्वेदींना थोरातांचा दिलासा

नागपूर : माजी मंत्री व शहरातील दबंग नेते सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन कॉंग्रेसने रद्द केले आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर चतुर्वेदींच्या समर्थकांनी शाई फेकली होती. त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेऊन त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. विशेष म्हणजे चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत चतुर्वेदी अलीकडेच शिवसेनेत दाखल झाले आहेत. 

चतुर्वेदी आणि माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे संबंध विकोपाला गेले होते. महापालिकेच्या निवडणुकीत आपल्या समर्थकांना उमेदवारी दिली नसल्याने चतुर्वेदी नाराज झाले होते. त्यावरुन तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याही सोबत त्यांचा वाद झाला होता.

चतुर्वेदी, नितीन राऊत एकीकडे तर मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष विकास ठाकरे दुसरीकडे असे दोन गट पडले होते. आजही दोन्ही गटामध्ये दुफळी कायम आहे. अशोक चव्हाण मुत्तेमवार गटाला झुकते माप देत असल्याने चतुर्वेदी नाराज होते. त्यामुळे आपल्या समर्थकांना हाताशी घेऊन त्यांनी समांतर मेळावे, कार्यक्रम घेणे सुरू केले होते. एकाच शहरात व एकाच वेळी कॉंग्रेसचे दोन कार्यक्रम घेतले जात होते.

याची तक्रार अशोक चव्हाण यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केली. त्यावरून चतुर्वेदी यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. अनेक नेत्यांच्या माध्यमातून चतुर्वेदी यांनी निलंबन मागे घेण्याचे प्रयत्न केले. काही नेत्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र अशोक चव्हाण यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केला होता. त्यामुळे कोणाचेच काही चालले नाही. चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदावरून जाताच चतुर्वेदी यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेवरून चतुर्वेदी यांचे निलंबन मागे घेण्यात आल्याचे पत्र सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी प्रसिद्ध केले केले आहे. त्याची एक प्रत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना आवर्जून पाठवण्यात आली आहे. मुत्तेमवार गटाला हा जबर धक्का मानला जात आहे. यासंदर्भात विकास ठाकरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. 

सतीशबाबू सेनेत जाणार की दुष्यंत कॉंग्रेसमध्ये येणार ? 
चतुर्वेदी यांचे पुत्र दुष्यंत यांनी अलीकडेच शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे सतीशबाबुसुद्धा सेनेत जातील अशी चर्चा सर्वत्र होती. काल आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे संपूर्ण नियोजन दुष्यंत यांनी केले होते. त्यांच्याच प्रियदर्शनी अभियांत्रिकी महाविद्यालयात आदित्य ठाकरे यांचा कार्यक्रम झाला. दुसऱ्याच दिवशी सतीश चतुर्वेदी यांचे निलंबन रद्द करण्यात आले. यामुळे राजकीय वतुर्ळात या "योगायोगा'ची चांगलीच चर्चा रंगली आहे. मुलापाठोपाठ सतीशबाबू सेनेत जाणार की, दुष्यंतला कॉंग्रेसमध्ये घेणार, ही चर्चा सध्या शहरात जोर पकडत आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com