Satish Chaturvedi and Nitin Raut free to join BJP | Sarkarnama

`सतिश चतुर्वेदी व नितीन राऊत यांनी खुशाल भाजपमध्ये जावे' 

सुरेश भुसारी
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

कॉंग्रेसची भूमिका समृद्धी महामार्गाच्या विरोधात असताना अचानकपणे या नेत्यांनी त्याचे समर्थन केल्याने कॉंग्रेस नेत्यांची अडचण निर्माण झाली आहे. या संदर्भात बोलताना नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी या दोन्ही माजी मंत्र्यांचा समाचार घेतला. 

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे समर्थन करणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांनी खुशाल भाजपमध्ये जावे, असा टोला नागपूर शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी लगावला आहे. 

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतिश चतुर्वेदी व नितीन राऊत यांनी समृद्धी महामार्गाचे समर्थन केले आहे. 
समृद्धी महामार्गाला कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने विरोध केला आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी व नितीन राऊत यांनी मात्र समृद्धी महामार्गाचे समर्थन केले आहे. विदर्भाच्या विकासासाठी समृद्धी महामार्गाची आवश्‍यकता असल्याचे या मंत्रीद्वयांनी समर्थन करताना म्हटले आहे. समृद्धी महामार्ग विदर्भ व मराठवाड्याच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरेल, असा दावा या माजी मंत्र्यांनी केली आहे. 

ठाकरे म्हणाले की चतुर्वेदी यांनी शिक्षण संस्थांसाठी शेकडो एकर जमीन हडपली आहे. या संदर्भात न्या. बट्टा यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी झाली आहे. नागपूर सुधार प्रन्यासमार्फत चौकशी झाली आहे. हा चौकशी अहवाल राज्य सरकारकडे सोपविण्यात आला आहे. यासंदर्भात कारवाई होऊ नये, यासाठी सरकारपुढे लाळघोटेपणा करण्याचा प्रयत्न असल्याचा टोला ठाकरे यांनी लावला. 

त्याचप्रमाणे नितीन राऊत यांनी उत्तर नागपुरातील बेझनबाग हाऊसिंग सोसायटीचा भूखंड हडपला आहे. याचेही प्रकरण सरकारकडे प्रलंबित आहे. या प्रकरणी या नेत्यावर कारवाई होऊ शकते. या कारवाया होऊ नये, याचा बचाव करण्यासाठी हे नेते सरकारच्या समृद्धी महामार्गाचे समर्थन करीत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. भाजपच्या धोरणाचा या नेत्यांना एवढा कळवळा असेल त्यांनी खुशाल भाजपमध्ये जावे परंतु कॉंग्रेसमध्ये राहून जनविरोधी व शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या समृद्धी महामार्गाचे समर्थन करू नये, असेही ठाकरे यांनी ठणकावले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख