सतेज पाटील 3 आमदार निवडून आणू शकतात!

पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.
सतेज पाटील 3 आमदार निवडून आणू शकतात!

कोल्हापूर : कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची माळ आमदार सतेज पाटील यांच्या गळ्यात पडल्याने त्यांच्या रूपाने पक्षाला जिल्ह्यातच नव्हे तर पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकारणात एक आश्‍वासक आणि तरूण चेहरा मिळाला आहे. 

राज्यातील सद्याच्या राजकीय परिस्थितीत दोन्ही कॉंग्रेसचे दिग्गज लोक पक्ष सोडून जात असताना श्री. पाटील यांची विधानसभा निवडणुकीत कसोटी लागणार असून पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

कोल्हापूर हा कॉंग्रेसचा एके काळचा बालेकिल्ला. कॉंग्रेसमध्ये फूट पडून राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरही हा बालेकिल्ला ढळला नव्हता. पण 2009 नंतर पक्षाच्या अस्तित्त्वाचा प्रश्‍न निर्माण झाला. जिल्ह्यातील 12 पैकी 12 आमदार आणि दोन्ही खासदार कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादीचे असायचे. जिल्ह्यातील जिल्हा बॅंकेसह महापालिका, नगरपालिका आणि पंचायत समितीवरीही कॉंग्रेसचे वर्चस्व होते.

नेत्यांतील मतभेदामुळे कॉंग्रेसेला उतरती कळा लागली, त्याचा परिणाम म्हणजे आज पक्षाची महापालिका सोडली तर कोठेही सत्ता नाही. जिल्हा बॅंकेत पक्षाला उपाध्यक्ष पद आहे पण ते नावापुरते आहे. पाडापाडीच्या राजकारणामुळे जिल्ह्यात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून हातात असलेली सत्ता नेत्यांच्या वादात भाजपाकडे गेली. करवीर वगळता इतर पंचायत समितीतही हीच स्थिती आहे. कुरुंदवाड नगरपालिका सोडली तर पक्ष कोठेही सत्तेत नाही. पी. एन. पाटील यांच्यामुळे "गोकुळ' मध्ये आहे म्हणायला सत्ता आहे, तिथेही आमदार पाटील विरूध्द माजी आमदार महादेवराव महाडिक हा संघर्ष आहेच. आमदार पाटील यांच्यामुळे महापालिकेत पक्ष सत्तेवर असला तरी त्याला राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा टेकू आहे. अशा परिस्थितीत श्री. पाटील यांच्यासमोर पक्षाला गतवैभव मिळवून देण्याचे आव्हान असेल. त्यासाठी नेत्यांतील अंतर्गत मतभेद बाजूला ठेवून दोन्ही कॉंग्रेसची आघाडी झाल्यास विधानसभेला जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याची जबाबदारी श्री. पाटील यांच्यावर असेल. 

करवीर, कोल्हापूर उत्तर व दक्षिणमध्ये त्यांना मानणारा प्रबळ गट आहे. या जोरावर या तिन्हीही मतदार संघात ते कॉंग्रेसचा आमदार विजयी करू शकतील अशी ताकद त्यांच्याकडे आहे. विधानपरिषद आणि "गोकुळ' च्या राजकारणामुळे जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदार संघात त्यांना कमी-अधिक प्रमाणात मानणारा पण मोठा असा गट आहे. त्या जोरावर ते इतर मतदार संघात कॉंग्रेसला ताकद देऊ शकतात.

तरूण चेहरा, प्रभावी वक्तृत्त्व, मोठा राजकीय अनुभव, सरकारी पातळीवर एखादे काम खेचून आणण्याची धमक, जिल्हाभर असलेली यंत्रणा, मजबूत अर्थिक ताकद या श्री. पाटील यांच्या जमेच्या बाजू आहेत. विधानसभेला ते स्वतः उमेदवार नसल्याने जिल्ह्यातच नव्हे तर सांगली, सातारा जिल्ह्यातही पक्षाच्या कार्यासाठी त्यांचा चांगला वापर होणार आहे. त्यांनीच मन लावून काम केले तर पक्षाला गतवैभव मिळण्यास अडचण नाही.
 
आतापर्यंतचे जिल्हाध्यक्ष:
कै. रत्नाप्पा कुंभार- 1948 ते 1955
दिनकरराव मुद्राळे - 1955 ते 1958
महादेव श्रेष्ठी - 1958 ते 1959
शंकरराव माने - 1959 ते 1962
बाबासाहेब खंजिरे - 1962 ते 1964
व्ही. के. चव्हाण-पाटील- 1965 ते 1967
उदयसिंगराव गायकवाड - 1968 ते 1971
हिंदुराव पाटील - 1972
अनंतराव भिडे - 1972 ते 1978
बाळासाहेब माने - 1978 ते 1979
एस. आर. पाटील - 1979 ते 1981
बाबुराव धारवाडे - 1981 ते 1989
शामराव भिवाजी पाटील- 1989
शंकरराव पाटील-कौलवकर - 1989 ते 1993
बाबासाहेब कुपेकर - 1993 ते 1997
पी. एन. पाटील - 1999 ते 2018
प्रकाश आवाडे - 2019 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com