राजकारण सोडेन; पण एका घरात दोन पक्ष ठेवणार नाही : महाडिकांना पाटलांचा असाही टोला

राजकारण सोडेन; पण एका घरात दोन पक्ष ठेवणार नाही : महाडिकांना पाटलांचा असाही टोला

कोल्हापूर : आजपर्यंत ज्यांनी विश्‍वासघाताचे राजकारण केले त्यांना लोकांनी घरी बसवले, महाडिकांसारखे दलबदलू राजकारण मला करायचे नाही. एकवेळ राजकारण सोडावे लागले तरी चालेल; पण एका घरात दोन पक्ष ठेवणार नाही. कोल्हापूर दक्षिण हे माझ्यासाठी कुरूक्षेत्र असून विधानसभा निवडणुकीसाठी या मतदारसंघातून पुतण्या ऋतुराज पाटील यांची उमेदवारी जाहीर करत असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी आज जाहीर केले.


ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे आयोजित सतेज संवाद मेळाव्यात ते बोलत होते. सुमारे तीन तास चाललेल्या मेळाव्यात सतेज पाटील स्वतःहून कोल्हापूर दक्षिणमधून उमेदवारीची घोषणा करतात की ऋतुराज, याची उत्सुकता कार्यकर्त्यांना लागून राहिली होती.

दक्षिण, करवीर तसेच कोल्हापूर उत्तरमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार प्रा. संजय मंडलिक, महापौर माधवी गवंडी, संजय डी. पाटील, प्रतिमा पाटील, उपमहापौर भूपाल शेटे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, ऍड, महादेवराव आडगुळे, शशिकांत खोत, गणी आजरेकर, मारुतराव कातवरे, वीरेंद्र मंडलिक, विजयसिंह मोरे, सदाशिवराव चरापले, ऍड. गुलाबराव घोरपडे, विक्रम जरग, बजरंग पाटील, भगवान पाटील आदी उपस्थित होते.

सतेज पाटील म्हणाले, राजकारणात कोणता तरी एक शत्रू ठरविला पाहिजे. कोल्हापूर दक्षिणमध्ये शत्रू कोण आहे, हे निश्‍चित आहे. 2009 ला सत्तर टक्के मतदारसंघ नवा असूनही मी निवडणुकीला सामोरे गेलो. करवीर, दक्षिण आणि उत्तर अशा तीन मतदारसंघात विभागणी झाली. पी. एन. पाटील हे करवीरमधून, मालोजीराजे हे उत्तरमधून तर मी दक्षिणचा पर्याय स्वीकारला. गेल्या निवडणुकीत गाफिलतेचा फटका मला बसला. नंतर ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या आपण जिंकल्या. दक्षिणमध्ये आज ऐंशी टक्के ग्रामपंचायती आपल्याकडे आहेत. मोठी ताकद उभी राहिली. ती योग्य पद्धतीने पुढे न्यावी लागेल.

विधानसभेच्या पराभवानंतरही तुम्ही लोकांनी तळ हातावरच्या फोडाप्रमाणे मला जपले. माझ्या उंबऱ्यावरील गर्दी कधी कमी झाली नाही. मी फसलो याची जाणीव झाली; पण लोकसभा निवडणुकीत मी सगळ्या गोष्टींची उत्तराई केली. खासदार संजय मंडलिक येथे उपस्थित राहिले. आज माझे सगळे काही फिटले. मंडलिक यांनी माणुसकीचा इतिहास आज रचला. कोल्हापूरच्या राजकारणाचा इतिहास सुवर्णअक्षरांनी ज्यावेळी लिहिला जाईल, त्यावेळी या इतिहासाची आठवण निश्‍चितपणे होईल. संजय हे सदाशिवराव मंडलिक यांचा छावा आहे. ज्यांनी विश्‍वासघाताचे राजकारण केले त्यांना लोकांनी घरी बसविले. गेल्या निवडणुकीत माझा पराभव झाला, त्यावेळी ताकद देण्याचे काम सदाशिवराव मंडलिक यांनी केले, असे पाटील यांनी सांगितले.

ज्यांच्या विरोधात आपण काम केले त्यांच्याकडे जायचे कसे, असा प्रश्‍न निर्माण झाला. एकदा पडलो म्हणजे थांबायचे नसते पुन्हा उठून उभे राहायचे असते, ही ऊर्जा मला मंडलिकांनी दिली. गोकुळसह सर्व निवडणुका संजय मंडलिक आणि आम्ही एकत्रित लढलो. लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देऊ का, असे विचारायलाही मी गेलो नाही. वेगवेगळे दहा चेहरे लोकांसमोर घेऊन जायचे आणि मते मागायची, हे आपल्याला जमणार नाही. गोकुळसाठी प्रतिमा अथवा कुणाचेही नाव मी देऊ शकलो असतो; पण बाबासाहेब चौगले यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे मी नाव पुढे केले. गगनबावडा तालुक्‍यातून ऋतुराजची जिल्हा परिषदेला मागणी होती. तेथे गेली 35 वर्षे कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष असलेल्या बजरंग पाटील यांना संधी दिली. कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न केला.
महाडिकांच्या राजकारणाचे दोन अंक संपलेल्याचे सांगून पाटील म्हणाले, दक्षिण हेच आपले आता कुरुक्षेत्र आहे. तेथेच लढाई करायची आहे, असे पाटील यांनी नमूद केले.

 
कोल्हापूर दक्षिणमधून मी आणि उत्तरमधून ऋतुराज अशी आमची तयारी सुरू होती, असे सांगून ते म्हणाले. मोठ्या सावलीत छोटी सावली झाकली जाते असे म्हटले जाते. कदाचित ऋतुराजचेही तसे झाले असेल; पण त्याचे काम मी जवळून पाहिले आहे. तरुण असल्याने त्याचीही काहीतरी इच्छा असणार. त्याला ताकद देण्याचा निर्णय घेतला; पण कधी केलेल्या कामाचा ढोल वाजविला नाही.
विधान परिषदेतील संख्याबळ कायम ठेवायचे असेल तर विधानसभेला तिकीट द्यायचे नाही, असा विचार सुरू झाला. माझी विधान परिषदेची आमदारकी अजून बाकी आहे. तिकडे राजीनामा देऊनच विधानसभा लढवावी लागेल. 2022 काय चित्र असेल हे आता सांगता येत नाही. त्यामुळे एका घरात दोन पक्ष नको आहेत. त्यामुळे कॉंग्रेसचा विचार पुढे न्यायचा आहे. एकवेळ राजकारण सोडायची वेळ आली तर चालेल; पण महाडिकांप्रमाणे दलबदलू राजकारण करायचे नाही. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणमधून माझ्याऐवजी ऋतुराज याची उमेदवारी जाहीर करत आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

``आयुष्यातील आजचा दिवस महत्त्वाचा आहे. विवेकानंद महाविद्यालयात "ट्रॅडिशनल डे'पासून कामाची सुरुवात झाली. युवकांचे संघटन केले. महापालिका निवडणुकीत काकांनी जबाबदारी दिली, ती पार पाडली. कोल्हापूर दक्षिण अथवा उत्तर असा भेद न करता, आमचे कुटुंबीय काम करत राहिले. सतेज पाटील यांनी 1200 कोटींची कामे केली. माझी निवडणूक ही तुमची निवडणूक आहे. तुम्ही बांधाल ते तोरण आणि सांगाल ते धोरण राहील. युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्‍न मोठा आहे. जिल्ह्यासाठी भविष्यात व्हिजन म्हणून निश्‍चितपणे काम करू,`` असे ऋतुराज पाटील यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com