`चंद्रकांतदादा, माझे वडील गेली 50 वर्षे मर्सिडिज वापरतात...`

satej patil
satej patil

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना "फिडींग' करणारी माणसं चुकीची आहेत. त्यांनी शिरोलीकरांचे ऐकणं बंद केले पाहिजे. माझ्या माहितीनुसार, त्यांना शिरोलीकरांनी मी आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात बोलण्यासाठी चिठ्ठी दिली. या चिठ्ठीनंतरच आमदार पाटील यांनी वक्‍तव्य केले, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीच्या अनुषंगाने पालकमंत्री सतेज पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. दोनच दिवसापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ व पाटील यांच्यावर व्यक्‍तीगत आरोप केले. थेट पाईपलाईनचा प्रश्‍न सुटत नाही; तोपर्यंत आमदारकीची निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा सतेज पाटील यांनी केली होती. त्या घोषणेचे काय झाले, अशी विचरणाही केली होती. त्यांच्या या वक्‍तव्याचा समाचार श्री. पाटील यांनी घेतला.

श्री. पाटील म्हणाले, ""2014 च्या निवडणुकीपुर्वी मी घोषणा केली होती की, 2014 मध्ये थेट पाईपलाईनचे काम झाले नाहीतर विधानसभा निवडणूक लढणार नाही; मात्र चंद्रकांत पाटील यांच्या स्मरणशक्‍तीला ब्रशिंग करुन सांगतो की, 2014 च्या आत ही योजना मंजूर केली. त्यासाठी 425 कोटी रुपये मंजूर केले. यानंतर भूमिपूजन केले. त्यांनी मात्र गेल्या पाच वर्षात एकही बैठक घेतली नाही. त्या योजनेचा आढावाही घेतला नाही.'' पाच वर्षात तुमचे सरकार होते. तुम्हाला काहीही करता आले असते; मात्र असे न करता केवळ आरोप करणे योग्य नाही. सत्ता गेल्यामुळे ते हवालदिल झाले आहेत, असा टोलाही पाटील यांनी लावला.

चंद्रकांत पाटील यांनी संपत्तीबाबत केलेल्या टीकेवरून ते म्हणाले, ""गेली 50 वर्षे डी. वाय. पाटील मर्सिडिज वापरतात. त्या काळात कोल्हापुरात कोणाकडेही अशी गाडी नव्हती. संपत्तीबाबतीतही बॅलन्स शीट आहे. कर्जाचीही माहिती आहे. याबाबत अनेकवेळा प्रश्‍नोत्तरे झाली आहेत. आम्ही कधीच चंद्रकांत पाटील यांचा व्यवसाय काय, अशी विचारणा केली नाही. राजकारणात वैयक्तिक पातळीवर, खालच्या पातळीवर टीका करण्याची गरज नसते. आम्ही ती करत नाही; मात्र ते केवळ दुसऱ्याचे ऐकून बोलत आहेत. त्यांनी मर्यादेत राहून बोलणे अपेक्षित आहे. भाजपसारख्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या व्यक्‍तीने गल्लीतील विषयावर चर्चा करणे, हे दुर्दैवी आहे आणि ते त्यांना शोभतही नाही.''

सूचक इशारा
चंद्रकांतदादांची चौकशी करणार का, या प्रश्‍नावर श्री. सतेज पाटील म्हणाले, ""मध्यंतरी शहरातील तालमीत पैसे दिले गेले. ते पैसे रोख स्वरुपात देण्यात आले. याची आता चर्चा सुरु झाली आहे.'' याबाबत तक्रारीही येत आहेत, असे सांगत त्यांनी चंद्रकांत पाटील यांना सूचक इशारा दिला.

त्यांना सावरण्याची शक्‍ती द्यावी ः मुश्रीफ
लहानपणापासूनच आमची परिस्थिती चांगली आहे. माझा कारखाना, आर्थिक स्थिती याबददल यापुर्वीही तक्रार आली आहे. त्याची त्या त्या वेळी उत्तरे दिली आहेत. त्यामुळे आता मला या विषयावर बोलण्यात स्वारस्थ नाही. सत्ता गेल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना झटका बसला आहे. त्यातून सावरण्याची परमेश्‍वराने त्यांना शक्‍ती द्यावी, अशी आपण प्रार्थना करत असल्याचे श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com