satej patil appointed as district president | Sarkarnama

काँग्रेसला 'अच्छे दिन' दाखवण्याची क्षमता असलेले सतेज बनले जिल्हाध्यक्ष!

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

श्री. पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्टेशन रोडवरील कॉंग्रेस कमिटी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्‍यांची आतषबाजी व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.  

कोल्हापूर : कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटील यांची आज निवड करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस ऍड. गणेश पाटील यांनी आज ही घोषणा केली. निवडीनंतर पाटील समर्थकांनी कॉंग्रेस कमिटीबाहेर फटाक्‍यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

प्रकाश आवाडे यांनी चार दिवसांपुर्वी कुटुंबासह कॉंग्रेसला रामराम केल्याने हे पद रिक्त होते. यापदासाठी श्री. पाटील यांच्यासह माजी मंत्री जयवंतराव आवळे, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ऍड. गुलाबराव घोरपडे यांच्या नावाची चर्चा होती. ऐन विधानसभेच्या तोंडावर जिल्हाध्यक्षच पक्ष सोडून गेल्याने कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली होती. अशा परिस्थितीत एक चांगला, तरूण आणि भक्कम पाठबळ असलेल्या नेत्यांचा शोध पक्षाच्या पातळीवर सुरू होता. गेले दोन दिवस यासंदर्भातील चर्चा मुंबई व दिल्लीत पक्षाच्या पातळीवर सुरू होती. कालच या संदर्भातील घोषणा होण्याची शक्‍यता होती. तथापि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर उमेदवार छाननी समितीच्या बैठकीत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेते व्यस्त असल्याने हा निर्णय लांबला होता. आज दुपारी मुंबईत या निवडीची घोषणा झाली.

प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी तब्बल 19 वर्षे या पदावर काम केले. त्यांना बदलून श्री. आवाडे यांना जिल्हाध्यक्ष करताना अनेक घडामोडी झाल्या. त्यातून हा विषय अतिशय प्रतिष्ठेचा करण्यात आला होता. 2012 मध्ये माजी खासदार कल्लाप्पा आवाडे व संजय घाटगे यांच्यात जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक झाली होती, त्यात श्री. आवाडे यांचा पराभव झाला. त्यापेक्षा या निवडीनंतर झालेल्या हाणामारीत श्री. आवाडे यांच्या कार्यकर्त्याला बेदम माराहाण झाली होती. त्यामुळे श्री. आवाडे हे नाराज होते आणि त्यातून त्यांनी हे पद दिल्लीतील लॉबीला हातशी धरून खेचून आणले होते. पण त्यांनी नऊ महिन्यातच पक्षाचा राजीनामा दिला.

पी. एन. पाटील हे स्वतः विधानसभेचे उमेदवार असल्याने ते पक्षासाठी वेळ देऊ शकणार नाहीत म्हणून त्यांचा विचार या पदासाठी झाला नाही. आमदार सतेज पाटील हे विधानसभेच्या रिंगणात नसणार आहेत, त्यामुळे ते पक्षासाठी वेळ देतील. त्यांची स्वतःची अशी यंत्रणा जिल्हाभर आहे, त्यांना मानणारा तरूण वर्गही मोठा आहे. त्याचा फायदा पक्षाला होईल या भावनेतून त्यांचीच या पदावर निवड करण्यात आली.

बिकट परस्थितीत पक्षाने मला जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे. यापूर्वीही मी राज्याच्या समन्वय समितीवर काम करीत होतो. सध्या जिल्ह्यातील पक्ष सावरण्याचे मोठे आव्हान आहे. पक्षाने त्याची जबाबदारी माझ्यावर दिली आहे. पक्ष पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि तरुणांच्या विचारणे करणार आहे. जिल्हा कॉग्रेस विचारांचा आहे, त्यामुळे पुन्हा पक्ष जोमाणे उभा राहिल याची खात्री आहे, अशी प्रतिक्रिया निवडीनंतर आमदार सतेज पाटील यांनी दिली.

सतेज पाटील यांची पार्श्‍वभुमी
श्री. पाटील यांचा जन्म 12 एप्रिल 1972 रोजी झाला. विद्यार्थी दशेपासूनच ते राजकारणात सक्रिय आहेत. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून ते शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर विजयी झाले होते. 2004 विधानसभा निवडणुकीत तत्कालिन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचा पराभव करून ते अपक्ष आमदार झाले, त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसला पाठिंबा दिला. मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर 2009 ची निवडणूक त्यांनी कोल्हापूर दक्षिणमधून लढवली. या निवडणुकीत त्यांनी पारंपारिक विरोधक व माजी खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव केला. त्यानंतर मंत्रीमंडळात त्यांना गृह, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्यमंत्रीपदी संधी मिळाली. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल यांनी पराभव केला. या पराभवानंतर त्यांनी 2016 ची विधानपरिषद निवडणूक कॉंग्रेसकडून लढवत महादेवराव महाडिक यांचाच पराभव करून वचपा काढला.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख