सातारकर पवारांच्या शब्दाला पक्के!

लोकसभा निवडणुकीत विजयी होऊनही अवघ्या पाचच महिन्यांत पुन्हा निवडणुकीला सामोरे जात अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या उदयनराजे भोसले यांना अखेर पराभव पाहावा लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा सुसाट वारू काबू करण्यात यश मिळविलेले आहे. राष्ट्रवादी हा बालेकिल्ला कोणत्याही स्थितीत पाडायचाच, हा भाजपचा मनसुबाच ढासळला असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. साताऱ्यात शरद पवारच जनतेचे राजे आहेत, हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा दावा या निकालाने अधोरेखित केला आहे.
सातारकर पवारांच्या शब्दाला पक्के!

खरेतर उदयनराजे आणि श्रीनिवास पाटील हे दोघे उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले असले, तरी साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लढली गेली ती "पवार विरुद्ध मोदी' अशीच. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा मोठा पगडा पूर्वीपासून सातारा जिल्ह्यावर आहे. तोच यशवंत विचार त्यांच्यानंतर शरद पवार यांनी पुढे नेण्याचा प्रयत्न केला. साहजिकच पवारांवर या जिल्ह्याने अतोनात प्रेम केले.

कॉंग्रेसमधून बाहेर पडून 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतरही झालेल्या सर्व निवडणुकांत इथल्या जनतेने पवारांना मोठे यश दिले होते. अलीकडच्या काही वर्षांत मात्र देशात "मोदी पर्वा'चा उदय झाला आणि भाजपने 2014 मध्ये केंद्रातील आणि त्यापाठोपाठ राज्यातील सत्ताही हस्तगत केली. पवारांना मानणाऱ्या साताऱ्यात मात्र 2014 मध्येही ना भाजपची डाळ शिजली, ना मोदींची जादू चालली. पाटण वगळता विधानसभेच्या सर्व जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच मिळाल्या. पाटणमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर शंभूराज देसाई विजयी झाले होते. मात्र, तो युतीच्या प्रभावाचा नव्हे, तर देसाईंच्या व्यक्तिगत ताकदीचा विजय होता.

2014 च्या निवडणुकीतील या परिस्थितीनंतर मात्र भाजपने सातारा जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले. काहीही करून पवारांची या जिल्ह्यावरील पकड कमी करायचीच, असा चंग बांधलेल्या भाजपने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि त्यापाठोपाठ उदयनराजे भोसले यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला मोठा धक्‍का दिला. 

मात्र, यथावकाश या धक्‍क्‍यातून सावरत श्री. पवार हे विधानसभेसोबतच या पोटनिवडणुकीच्या तयारीला लागले. उदयनराजे यांच्या विरोधात कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उतरविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र, चव्हाण यांनी नकार देताच श्री. पवार यांनी माजी सनदी अधिकारी आणि सिक्‍कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली. सातारा जिल्ह्यात चांगली प्रतिमा असलेल्या पाटील यांनीही उदयनराजेंना "कॉंटे की टक्‍कर' देत आपला विजय साकारला. 

उदयनराजेंचा पराभव होण्यामागे जी काही कारणे सांगितली जातील, त्यातील एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांनी घेतलेली दुटप्पी भूमिका. सहा महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्या आमदारांच्या ताकदीवर ते विजयी झाले, त्याच आमदारांच्या विरोधात ते या पोटनिवडणुकीत विरोधात उभे राहिले. एप्रिलमधील लोकसभा निवडणुकीत मी म्हणजे मकरंद पाटील, मी म्हणजे बाळासाहेब पाटील अशी साऱ्या आमदारांची नावे घेत आवाहन करणारे उदयनराजे पाच महिन्यांत त्यांच्यावर टीका कशी करू शकतात, असा सवाल सुज्ञ जनतेला पडला. त्यांची ही भूमिका जनतेला रुचली नाही. 

खरेतर भाजपनेही ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची करत उदयनराजेंना मोठे पाठबळ दिले. त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभाही घेण्यात आली. "विराट' असे वर्णन करता येईल, अशी मोदी यांची ही सभा झाली. मात्र, त्याच्या दुसऱ्याच दिवशी भरपावसात झालेल्या पवारांच्या सभेने फार मोठा चमत्कार घडवला. मुळात सारे काही आलबेल असताना ऐनवेळी उदयनराजे सोडून गेल्याने पवारांबाबत या जिल्ह्यात सुप्त सहानुभूती होतीच. या पावसातील सभेने त्यात आणखी भर घातली आणि या सभेमुळे मोदींची सभा पुसून टाकली गेली. उदयनराजेंचा पराभव या पावसातच दृष्टोत्पत्तीस येऊ लागला होता. मात्र, तो निश्‍चित झाला पवारांच्या सभेच्या दुसऱ्या दिवशी उदयनराजेंच्या कऱ्हाडमधील सभेत. खरेतर उदयनराजेंनीच या सभेत आपला पराभव स्वत:च रचला. 

"उदयनराजेंना याआधी तिकीट देऊन मी चूक केली. ही चूक जनतेने दुरुस्त करावी,' अशी भावनिक साद पवार यांनी आपल्या सभेत घातली होती. पवार यांची ही साद हा त्या सभेतील परमोच्च क्षण होता. वारे फिरवणारा होता. मात्र, उदयनराजेंनी दुसऱ्या दिवशी कऱ्हाडमध्ये पवारांच्या या सभेची खिल्ली उडविण्याच्या नादात त्यांच्यावर जहरी टीका केली. "पवारांची पावसातली सभा म्हणजे काळू-बाळूचा तमाशा होता,' हे उदयनराजेंचे स्टेटमेंट त्यांचा पाय आणखी खोलात घेऊन गेले. आम्ही पवारांसारखा पाठीत खंजीर खुपसला नाही, हे उदयनराजेंचे शब्दही जनतेला रुचले नाहीत. 

ज्या पवारांनी 2009 मध्ये उदयराजेंना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन त्यांचं राजकीय पुनर्वसन केले, त्यांना तीन वेळा खासदार केले, त्या पवारांच्या विरोधात उदयनराजेंनी अशा प्रकारे बोलणं जनतेच्या जिव्हारी लागलं. उदयनराजेंचा पराभव त्यामुळे आणखी अधोरेखित झाला. उदयनराजेंनी पवारांवर केलेल्या या टीकेमुळे 1980 मध्ये शालिनीताई पाटील आणि यशवंतराव चव्हाण यांच्यात लढल्या गेलेल्या निवडणुकीची आठवण झाल्याचे जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठांनी नमूद केले. त्या निवडणुकीपासून या जिल्ह्याने जपलेला यशवंत विचार जनतेने या निवडणुकीतही सोडला नाही आणि उदयनराजेंना हा यशवंत विचार समजलाच नाही. त्यांचा आजचा पराभव त्याचेच तर द्योतक आहे. पवारांनी आपल्या सभेत मी केलेली चूक दुरुस्त करा, असे आवाहन जनतेला केले होते. जनतेने ही चूक दुरुस्त केली. या निकालाचा असाही एक अर्थ महाराष्ट्रातील भविष्यातील पिढ्यांना सांगितला जाईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com