satara zp politics | Sarkarnama

शरद पवारांनी ऐनवेळी बदलले साताऱ्याचे उपाध्यक्षपद 

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो 
मंगळवार, 21 मार्च 2017

उपाध्यक्षपदासाठी पाटणचे राजेश पवार यांचे नाव निश्‍चित होते. यासंदर्भात शरद पवारांशी मोबाईलवरून चर्चा करूनच श्री. पाटणकर व रामराजेंनी नाव निश्‍चित केले
होते. पण ऐनवेळी शिवेंद्रसिंहराजेंनी शरद पवारांशी मोबाईलवरून बोलून राजेश पवार यांच्या नावे बाजूला करून वसंतराव मानकुमरेंचे नाव निश्‍चित केले. त्यामुळे
बारामतीशी बोलल्याशिवाय कोणतेच पद निश्‍चित होत नाही, हे आजच्या निवड प्रक्रियेतून स्पष्ट झाले. तर जिल्ह्याच्या राजकारणात रामराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंची
राजकीय ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले. 

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे दावेदार ठरविण्यासाठी आज झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी संजीवराजेंचे नाव
सर्वानुमते ठरले. पण उपाध्यक्षपदावरून विक्रमसिंह पाटणकर व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अगदी शरद पवारांना थेट फोनवर
बोलून शिवेंद्रसिंहरजेंनी मानकुमरेंचे उपाध्यक्षपद मिळवले. तर शिक्षण सभापतीपदाला मान्यता देत विक्रमसिंह पाटणकरांनी नमते घेतले. तर मानसिंगराव जगदाळेंची
शिवेंद्रसिंहराजेंनी समजूत काढताना यापुढे आम्ही तुमच्या पाठीशी राहू, असा शब्द दिल्याने वादावर पडदा पडला. 

या बैठकीला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते विक्रमसिंह पाटणकर, प्रदेश पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले,
बाळासाहेब पाटील, मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नरेंद्र पाटील, सुनील माने, बाळासाहेब भिलारे तसेच अध्यक्षपदाचे दावेदार संजीवराजे नाईक निंबाळकर, वसंतराव
मानकुमरे, मानसिंगराव जगदाळे, सुरेंद्र गुदगे, राजेश पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते. 

प्रारंभी अध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव निश्‍चित केल्याचे आमदारांनी सांगितले. या निर्णयाला कोणीही विरोध केला नाही. सर्वांनी मान्यता
दिल्याने उपाध्यक्ष पदासाठीची रस्सीखेच सुरू झाली. सुरवातीलाच विक्रमसिंह पाटणकर यांनी भूमिका मांडताना आम्हाला पक्षश्रेष्ठी शरद पवारांनी शब्द दिला आहे.
त्यानुसार राजेश पवार यांचेच नाव निश्‍चित करावे, असा मुद्दा मांडला. यावरून आमदार शिवेंद्रसिंहराजे चांगलेच संतप्त झाले. आम्ही खासदारांना अंगावर घ्यायचे
पक्षासाठी झटायचे आणि तुम्ही पाटणला पद द्यायचे योग्य नाही. वसंतराव मानकुमरेंनाच उपाध्यक्षपद मिळाले पाहिजे. 

या वादात हस्तक्षेप करत रामराजे म्हणाले, शरद पवारांनीच राजेश पवार यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी घेण्यास सांगितले आहे. यावर शिवेंद्रसिंहराजे अधिकच आक्रमक
झाले. यावेळी शिवेंद्रसिंहराजेंना आमदार नरेंद्र पाटील यांनी साथ देत तुम्ही शरद पवारांशी का बोलत नाही, असे सांगत मोबाईलवरून पवार साहेबांशी बोला असे
सांगितले. त्यानंतर वसंतराव मानकुमरे बैठकीतून बाहेर उठून गेले. याच दरम्यान, शिवेंद्रसिंहराजेंनी शरद पवारांशी मोबाईलवरून संपर्क साधून आगामी लोकसभेच्या
निवडणूक सोपी होण्यासाठी जावलीला पद दिले पाहिजे. आम्ही खासदारांविरोधात भूमिका घेतली आहे. पक्षासाठी मानकुमरेंनी खासदारांविरोधात भूमिका घेत दगडे
झेलली आहेत. त्यामुळे पक्षाने याचा विचार करून मानकुमरेंना संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. त्यावर श्री. पवार यांनी तसे असेल तर जावळीला उपाध्यक्षपद
देण्याबाबत विचार व्हावा, अशी सूचना रामराजेंना केली. त्यानंतर उपाध्यक्ष पदावरून पाटणचे नाव खुडून जावळीचे वसंतराव मानकुमरे यांचे नाव पुढे आले व अंतिम
झाले. 

याच दरम्यान, मानसिंगराव जगदाळेंना उपाध्यक्ष पद द्यावे, म्हणून आमदार शशिकांत शिंदे व सुनील मानेंनी भूमिका मांडली. पण त्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केले.
पाटणचे आमदार असूनही विक्रमसिंह पाटणकरांच्या बाजूने नरेंद्र पाटील यांनी भूमिका न मांडता शिवेंद्रसिंहराजेंची पाठराखण केली. बैठकीच्या सुरवातीला माणला
उपाध्यक्ष पद देण्यासाठी शेखर गोरेंनीही आग्रह धरला होता. पण पोळ तात्यांच्या सुनेला महिला व बालकल्याण सभापती पद दिले जाणार असल्याने व माण माढा
मतदारसंघात येत असल्याने एकाच मतदारसंघात दोन पदे देता येत नसल्याचे रामराजेंनी सांगितल्याने शेखर गोरे शांत झाले. 
यानंतर आमदार शशिकांत शिंदे व रामराजेंनी भूमिका मांडून दोघांनी नावे निश्‍चित झाल्याचे स्पष्ट केले. तेथूनच सर्व सदस्य व सूचक व अनुमोदकांना घेऊन अर्ज
दाखल करण्यासाठी संजीवराजे नाईक निंबाळकर व वसंतराव मानकुमरे हे जिल्हा परिषदेत गेले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख