satara zp politics | Sarkarnama

अध्यक्षपदासाठी इच्छुकांचे मुंबईत ठाण

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 16 मार्च 2017

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या काहींनी थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. तर काही इच्छुक मुंबईतच ठाण मांडून बसल्याने रामराजे नाईक निंबाळकरांसह आमदारांची अडचण झाली आहे.

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या काहींनी थेट पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी संपर्क साधला आहे. तर काही इच्छुक मुंबईतच ठाण मांडून बसल्याने रामराजे नाईक निंबाळकरांसह आमदारांची अडचण झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुकांनी लावलेल्या फिल्डींगमुळे राष्ट्रवादीची नेते मंडळी अडचणीत येऊ लागली आहे. सुरवातीपासून रामराजेंचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांचेच नाव अध्यक्षपदासाठी निश्‍चित झाल्याचे मानले जात होते. पण खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या इतर दिग्गजांनी आपणच या पदासाठी पात्र कसे हे आपापल्या आमदारांपुढे मांडले. त्यातून आमदारांचेही मतपरिवर्तन झाले. यातून इच्छुकांच्या आशा आकांक्षा बळावल्या आहेत. त्यामुळे आमदारांच्या पाठबळातून काही इच्छुक मंडळी थेट शरद पवारांपर्यंत पोहचून अध्यक्षपदासाठी आपण इच्छुक असल्याचे सांगू लागले आहेत.

कऱ्हाड तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य मानसिंगराव जगदाळे यांनी पुण्यात नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली. इच्छुकांचा तगादा चुकविण्यासाठी आमदारांनी सातारा जिल्ह्यात येणे टाळले आहे. त्यामुळे इच्छुक मुंबईत जाऊन बसले आहेत. नेत्यांच्या तोंडून अध्यक्षपदासाठी आपलेच नाव यावे यासाठी सर्वते प्रयत्न सुरू आहेत. पण प्रत्यक्षात सोमवारी (ता. 20) साताऱ्यात सर्व आमदारांसोबत ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची बैठक होऊन त्यामध्ये अध्यक्षपदासाठी दोन व उपाध्यक्षपदासाठी दोन नावे निश्‍चित केली जातील. ही नावे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळविण्यात येतील. त्यांच्याकडून दोन्हीपदासाठी एकेकाचेच नाव निश्‍चित होईल. ते नाव 21 मार्चला सकाळी दहा वाजता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी सांगितले जाईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख