satara zp | Sarkarnama

निवडणूक खर्च सादर न केल्याने नोटिसा 

सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीचा निकाल लागून दीड महिना झाला तरी निवडून आलेल्या 127 उमेदवारांनी अद्याप आपला निवडणुकीत झालेला खर्च जमा केलेला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाने या उमेदवारांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. 

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुकीचा निकाल लागून दीड महिना झाला तरी निवडून आलेल्या 127 उमेदवारांनी अद्याप आपला निवडणुकीत झालेला खर्च जमा केलेला नाही. त्यामुळे निवडणूक विभागाने या उमेदवारांना अपात्र का ठरवू नये, अशी नोटीस बजावण्यास सुरवात केली आहे. 

निवडणुकीच्या निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी निवडणुकीत केलेला खर्च एक महिन्यात निवडणूक विभागाकडे द्यायचा असतो. जो सदस्य दिलेल्या मुदतीत खर्च जमा करणार नाही तो निवडणूक आयोगाच्या नियमानुसार अपात्र ठरू शकतो. त्यासाठी जिल्हाधिकारी संबंधित सदस्याला नोटीस बजावून त्याचे म्हणणे मांडण्याची संधी देतात. समर्पक म्हणणे नसल्यास संबंधित सदस्य अपात्र ठरतो. 

जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक निकाल लागून तब्बल दीड महिना झाला तरी जिल्ह्यातील 127 विजय उमेदवारांनी आपला खर्च जमा केलेला नाही. निवडणुकीत विजय झाला की सदस्य सत्कार समारंभात गुंग राहतात. तर काहीजण मतदारांच्या भेटीवर असतात. आता यात्रा, जत्रांचा हंगाम असल्याने गावोगावच्या यात्रांना भेट देण्यावर त्यांचा भर राहतो.

या सर्व लगबगीत निवडणुकीत केलेला खर्च जमा करण्यास अनेकजण विसरतात. तर काहीजण आजारपण, विविध कारणांमुळे निवडणुकीत केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक विभागाकडे जमा करण्याकडे उमेदवारांचे दुर्लक्ष होते. याचा फटका संबंधित सदस्यांना बसतो. पण आपला खर्च जमा करण्याचा राहिला आहे, हे निवडणूक विभागाची नोटीस असल्यावरच संबंधित सदस्यांच्या लक्षात येते. ऐनवेळी खर्च जमा करताना सदस्य व त्यांच्या कार्यकर्त्यांची धावपळ होताना दिसते. आता दीड महिना होऊनही जिल्ह्यातील निवडून आलेल्या 127 सदस्यांनी आपला खर्च जमा केलेला नाही. यामध्ये जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले 40 तर पंचायत समितीवर निवडून गेलेले 87 सदस्यांचा समावेश आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख