satara zp | Sarkarnama

सातारा जिल्हापरिषदेचे  अध्यक्षपद फलटण की जावळीत? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सिंहासनावर फलटणकर विराजमान होणार, की जावळीतील शिलेदार अध्यक्ष होणार याची चर्चा निवडणुकीचा धुरळा खाली बसताच होऊ लागली आहे. सध्यातरी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि वसंतराव मानकुमरे यांचीच नावे प्राधान्याने चर्चेत आहेत. संजीवराजेंच्या नावावरच शिक्का मोर्तब होणार, हे सध्यातरी निश्‍चित असले तरी ऐनवेळी नवीन नाव पुढे येण्याची शक्‍यता आहे. 

सातारा - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या सिंहासनावर फलटणकर विराजमान होणार, की जावळीतील शिलेदार अध्यक्ष होणार याची चर्चा निवडणुकीचा धुरळा खाली बसताच होऊ लागली आहे. सध्यातरी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि वसंतराव मानकुमरे यांचीच नावे प्राधान्याने चर्चेत आहेत. संजीवराजेंच्या नावावरच शिक्का मोर्तब होणार, हे सध्यातरी निश्‍चित असले तरी ऐनवेळी नवीन नाव पुढे येण्याची शक्‍यता आहे. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर गेली काही वर्षे आरक्षणामुळे सातत्याने महिलांना संधी मिळाली. यावेळी अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी खुले आहे. सहाजिकच अध्यक्षपद भुषविण्याच्या अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. या अध्यक्षपदावर डोळा ठेऊन खुल्या गटात इच्छुकांची संख्या वाढली. पण यातील नितीन भरगुडे पाटील, ऋषिकांत शिंदे हे पराभूत झाले. त्यामुळे आता संजीवराजे नाईक निंबाळकर, वसंतराव मानकुमरे, मानसिंगराव जगदाळे, दत्ता अनपट, मनोज पवार, राजेश पवार, मंगेश धुमाळ हे या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असतील. यापैकी अनुभवी आणि जिल्हा परिषदेचा गाडा यशस्वीपणे चालवू शकणाऱ्या तिघांचीच नावे पुढे येत आहेत. यामध्ये संजीवराजे नाईक निंबाळकर, मानसिंगराव जगदाळे आणि वसंतराव मानकुमरे यांचा समावेश आहे. आमदार नरेंद्र पाटील यांचे बंधू रमेश पाटील यांचेही नाव शर्यतीत आहे. पण ते पहिल्यांदाच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. 

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान,आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मानकुमरेंना लाल दिव्याचे स्वप्न दाखविले आहे. मात्र, निकालाच्या दिवशी मानकुमरेंना पोलिस कोठडीत राहावे लागले. सातारा-जावळीचे आगामी राजकारण व उदयनराजेंना थोपण्याच्या रणनितीचा एक भाग म्हणून शिवेंद्रराजेंकडून मानकुमरेंच्या नावाचा आग्रह धरला जाऊ शकतो. सर्वाधिक सदस्य निवडून आणल्याची फुटपट्टी त्यासाठी वापरल्यास लाल दिव्याचे सर्वात प्रबळ दावेदार सध्या तरी, संजीवराजे नाईक-निंबाळकर हेच आहेत. त्यांनी सलग चौथ्यांदा मोठ्या मताधिक्‍याने जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. सभागृहातील सर्वात अनुभवी सदस्य ते असणार आहेत. फलटण तालुक्‍यावर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व राखण्यात त्यांची महत्वाची भुमिका आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची ताकद त्यांच्या मागे आहे. आजवर केवळ अध्यपदाच्या आरक्षणामुळेच ते लाल दिव्यापासून दूर होते. त्यामुळे त्यांना ही पहिलीच संधी मिळण्याची शक्‍यता जास्त आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख