Satara will be stronghold of bjp-ss says shambhuraj desai | Sarkarnama

सातारा भाजप, शिवसेनेचा बालेकिल्ला होणार : शंभूराज देसाई

सरकारनामा ब्युरो
रविवार, 15 सप्टेंबर 2019

गेल्या पाच वर्षांच्या काळात राज्य व केंद्रातील युती सरकारने राबविलेल्या विविध योजना व केलेली विकास कामांमुळे आता जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी युतीमध्ये सहभागी होत आहेत. शिवेंद्रसिंहराजे, जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा भाजप, शिवसेनेचा बालेकिल्ला होईल, असा विश्‍वास शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.

सातारा : गेल्या पाच वर्षांच्या काळात राज्य व केंद्रातील युती सरकारने राबविलेल्या विविध योजना व केलेली विकास कामांमुळे आता जिल्ह्यातील प्रमुख नेते मंडळी युतीमध्ये सहभागी होत आहेत. शिवेंद्रसिंहराजे, जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपमध्ये प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद मोठ्याप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सातारा भाजप, शिवसेनेचा बालेकिल्ला होईल, असा विश्‍वास शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे माझे मित्र आहेत. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे मला आनंद होत आहे. 1995 ते 1999 या कालावधीत युती शासनाच्या काळात मी सहकार परिषदेचा अध्यक्ष होतो. त्यावेळी उदयनराजे कृष्णाखोऱ्याचे उपाध्यक्ष आणि महसूल राज्यमंत्री होते. युतीच्या काळात आम्ही एकत्र काम केले होते. त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि खासदार झाले. आता पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे ते युतीमध्ये आले आहेत. 

सध्या शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही ही निवडणुक युतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय घेतला आहे. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून विधानसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार निवडणुक येण्यास मदत होणार आहे. उदयनराजे सर्वांना बरोबर घेऊन काम करतात. त्यामुळे आमची सर्वांची ताकद त्यांच्या पाठीशी असेल. मुळात ते कोणत्याही पक्षाच्या चौकटीत राहून काम करू शकत नाहीत. ते स्वतंत्र विद्यापीठ आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आगामी काळात चांगले काम होणार आहे. आता जिल्ह्यातील राजकिय समीकरणे बदलत आहेत. 

गेल्यावेळी पाच आमदार राष्ट्रवादीचे, दोन कॉंग्रेसचे आणि एक शिवसेनेचा अशी परिस्थिती होती. ही परिस्थिती आता बदलणार असून शिवसेना भाजप युतीचे उमेदवार जिल्ह्यात निवडुन येतील. त्यासाठी उदयनराजेंचे पाठबळ सर्व उमेदवारांना मिळेल. त्यामुळे आगामी काळात सातारा जिल्हा युतीचा बालेकिल्ला होईल, असा विश्‍वास आमदार शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख