Satara SP Tejaswi Satpue Gives Instructions to Police | Sarkarnama

साताऱ्याच्या पोलिस कुटुंब प्रमुख तेजस्वी सातपुतेंचा पोलिसांना संदेश

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

विनाकारण असभ्य भाष्य व बलप्रयोग करू नका, न ऐकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, बेशिस्त बळाचा वापर नको, अशी सूचना साताऱ्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत

सातारा : विनाकारण असभ्य भाष्य व बलप्रयोग करू नका, न ऐकणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, बेशिस्त बळाचा वापर नको, अशी सूचना साताऱ्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, सूचनांचे तंतोतंत पालन करा,असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे.

साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बुधवारी (ता.२५) रात्री पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना एक संदेश पाठविला आहे. यामध्ये त्यांनी पोलिसांच्या कामाच्या कौतुक करतानाच काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस आणि समाज एकत्ररित्या राहून कोरोनाचे युद्ध जिंकायचे आहे असे ही त्यांनी नमूद केले आहे.

तेजस्वी सातपुते आपल्या संदेशात म्हणतात ''गेले अनेक दिवस आपण कोरोनाच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून वेगवेगळी कर्तव्ये पार पाडत आहोत.  गेल्या चार दिवसांपासून आपण अत्यंत खडतर असणारे काम म्हणजे संचारबंदीचे यशस्वीरित्या अंमलबजावणी करण्याचे काम करीत आहोत. बहुतांश कर्मचारी हे अतिशय उत्तम काम करीत आहेत. खूप त्रासात आहे. उन्हात उभे राहावे लागत आहे. तासनतास काम करावे लागत आहे. जेवणाचे हाल होत आहेत. पण तरी सुद्धा आपले कर्मचारी न डगमता चांगले काम करायचे सोडत नाही. मला खरोखर तुमच्या सगळ्यांचा अभिमान वाटतो. परंतु अपवादत्मक परिस्थितीमध्ये आपल्याकडून काही चूका होताना दिसत आहेत. अत्यावश्यक सेवा देणारे व्यक्ती, काही लोक, त्यांचे मदतनीस, त्यांच्या गाड्या अडविल्याच्या तक्रारी येत आहेत. या तक्रारी येऊ नयेत, आपल्याला कोणाला अडवायचे आहे आणि कोणाला नाही याची कल्पना मी आपणांस यापूर्वीच दिली आहे. तक्रारींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे परंतु अजूनही त्या थांबलेल्या नाहीत.''

त्या पुढे म्हणतात, "मित्रांनो लक्षात घ्या आपल्या सर्वांवर खूप मोठी जबाबदारी आहे. संचारबंदी, जमावबंदीच्या अंमलबजावणीचे, ३३ लाखांच्या सातारामध्ये २७०० लोकांनी हे काम करुन दाखविणे खरोखर सोपे नाही.  हे शिवधन्युष्य आपण सर्वजण पेलत आहोत. तुम्ही सर्वजण पेलत आहात. बहुतांश लोक हे समजदार आहेत. ३३ लाखांपैकी किती लोक दिसतात आपल्याला बाहेर येणारे. बहुतांश लोक आदेशाचे पालन करीत आहेत. ते समजदारच आहेत. काही लोक आहेत ते याबाबतीत असहकार्य करीत आहेत. काही लोक जाणून बुजून खोडसाळपणा म्हणून करतात, काही लोकांची खरोखर अडचण असते, काही लोकांना परिस्थितीची कल्पना नसते. म्हणून हे लोक आपले शत्रू आहेत असे धरुन चालालय का? याच लोकांच्या सुरक्षिततेसाठी आपण चौका चौकात उभे आहोत. दिवस रात्र कार्यरत आहोत. या लोकांचे भलेच करायचे आहे हे आपल्या डोक्यात कायम असले पाहिजे. काही असहकार्य करीत आहेत. म्हणून सरसकट आलेल्यांना अशासकीय भाषा , असभ्य भाषा आपल्या  तोंडून जाता कामा नये. आपण त्रासात आहात मला सर्व मान्य आहे. परंतु आपल्याला संयमाने काम करावे लागेल.''

तेजस्वी सातपुते यांच्या संदेशातले ठळक मुद्दे...

- नवीन शैली लोकांच्या अंगी येईल
- दुकानांसमोर ग्राहकांमध्ये तीन फुटांचे अंतर ठेवा
- आपल्याला समन्यवयाची भूमीका ठेवायची आहे
- अनावश्यक बळाचा वापर नको
- प्रत्येक कृती जतून करा
- अनावश्यक बळ वापरल्यास लाँग टर्म इफेक्ट चांगला होणार नाही
- सर्वांना एकसारखी वागणूक नको
- दूधवाल्यांना अडवले तर घरातली लहान मुले काय पिणार?
- डाॅक्टरर्सना त्रास झाला तर ते दवाखान्यापर्यंत पोहोचणार नाहीत
- नाठाळांना घरी जाण्याच्या सूचना द्या
- नाहीच ऐकले तर पोलिस ठाण्यात आणून कायदेशीर कारवाई करा
- अशोभनीय शब्द वापरणे, एकट्या दुकट्याला चार-दोन जणांनी लाठीने मारणे हे नको
- आपल्याकडून बेशिस्त वर्तन झाले तर मला कारवाई करावी लागेल
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख