satara politics | Sarkarnama

उदयनराजे, गोरेंना संपविण्याची राष्ट्रवादीची रणनीती 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मे 2017

राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीपूर्वीच आपल्या विरोधकांचे पानिपत करण्याची घाई आहे. या नादात रामराजेंवर उदयनराजे व गोरेंकडून एकेरी स्वरूपाची टीका होऊ लागली आहे. सध्या रामराजे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्याने ते परत आल्यावर या दोघांना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सातारा : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात राष्ट्रवादीने आपले विरोधक संपविण्याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादीचेच परंतु पक्षाला कायम डावलणारे खासदार उदयनराजे भोसले व कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. तर या दोन्ही लोकप्रतिनिधींनी विधान परिषदेचे सभापती रामराजे यांना टार्गेट केले आहे. यातूनच रामराजे विरोधात उदयनराजे आणि गोरे असा संघर्ष जिल्ह्यात पेटला आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणात फलटणच्या निंबाळकर घराण्याचे पहिल्यापासून वर्चस्व राहिले आहे. आता तर राष्ट्रवादीचे नेते विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे पक्षाची सूत्रे आहेत. शेंद्रे येथील मेळाव्यात खासदार उदयनराजेंच्या विरोधात रामराजेंसह शिवेंद्रसिंहराजेंनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापुढे तक्रारीचा पाढा वाचला. या तक्रारी लक्षात घेऊन श्री. पवार यांनी जिल्ह्याची सूत्रे रामराजेंच्या हातात दिली. त्यावेळेपासून रामराजेंनी आपले व पक्षाचे विरोधक खासदार उदयनराजे भोसले व कॉंग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आणण्यासाठी विविध प्रकारच्या राजकीय व्यूहरचना आखल्या आहेत. 

विशेष म्हणजे जिल्हा परिषद निवडणुकीत खासदार उदयनराजे व आमदार गोरेंना फटका बसला. गोरेंची माणमधील ताकद कमी झाली तर उदयनराजेंची सातारा तालुक्‍यात संमिश्र यश मिळाले. कमी होणारी ताकद आणि राजकीय अस्तित्वाला धक्का लागू नये म्हणून उदयनराजे व गोरे यांची धडपड सुरू आहे. मध्यंतरी उदयनराजेंवर सोना कंपनीच्या मालकाला खंडणी मागितल्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. यातून अटक टाळण्यासाठी सध्या उदयनराजे ऑऊटऑफ कव्हरेज आहेत. तर आपल्या नेत्याच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होऊ लागल्याने त्यांचे समर्थक आता रस्त्यावर उतरून या संघर्षात सामील होण्याची तयारी करू लागले आहेत. 

दुसरीकडे गोरेंवर मध्यंतरी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. त्यातून सावरताना त्यांची नाही म्हटले राजकीय हानी झाली आहे. कदाचित जिल्हा परिषद निवडणुकीत शेखर गोरेंची झालेली काहीशी सरशी हे त्याचे उदाहरण आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार भोसले यांना सध्यातरी पूर्ण बाजूला ठेवले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत उदयनराजे दुसऱ्या पक्षात असणार हे निश्‍चित आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख