satara politics | Sarkarnama

सदाभाऊ जोमात... शिवतारे अज्ञातवासात !

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 एप्रिल 2017

टंचाई परिस्थितीत टंचाईचा आढावा घेऊन मागणी असेल तेथे तातडीने टॅंकर सुरू करण्याबाबत सूचना करण्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे कुठेच दिसेनासे झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्याकडे पुन्हा त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यांच्या ऐवजी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत टंचाई आढावा घेत आहेत.

सातारा : जिल्ह्यातील 16 गावे 138 वाड्यांना 27 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. वाई, महाबळेश्‍वर, जावली व साताऱ्यातील काही गावांत टंचाई जाणवू लागली आहे. अशा परिस्थितीत टंचाईचा आढावा घेऊन मागणी असेल तेथे तातडीने टॅंकर सुरू करण्याबाबत सूचना करण्यासाठी पालकमंत्री विजय शिवतारे कुठेच दिसेनासे झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्याकडे पुन्हा त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यांच्या ऐवजी सहपालकमंत्री सदाभाऊ खोत टंचाई आढावा घेत आहेत. जिल्ह्यात सदाभाऊ जोमात तर शिवतारे अज्ञातवासात असल्याची चर्चा आहे.

जिल्ह्याला शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत समाधानाचे व चैतन्याचे वातावरण होते. त्यांच्याकडून शिवसेनेची पुन्हा बांधणी होईल, असे वाटत होते. पण पक्ष संघटना बांधणीकडे शिवतारेंनी फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे जाळे विस्कळित राहिले. तसेच त्यांचे जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांकडेही दुर्लक्ष राहिले. बैठक, सभा, कार्यक्रमांच्या निमित्तानेच श्री. शिवतारे जिल्ह्यात येतात. त्यामुळे अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी व शासकीय कामे वेगाने होण्यासाठी पालकमंत्र्यांचा जो धाक असायला हवा होता. तो राहिला नाही. शिवतारेंचे जिल्ह्याकडे दुर्लक्ष होतय म्हणून की काय सदाभाऊ खोत यांना सहपालकमंत्री पदाची जबाबदारी मिळाली. त्यांनी जिल्ह्यात लक्ष घालून आता टंचाई परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळी तालुक्‍यातील जनतेची मते जाणून घेऊन त्यानुसार अधिकाऱ्यांना सूचना करण्यासाठी बैठका घेण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे पालकमंत्री कुठेच दिसेनात तर सहपालकमंत्री जोरात अशी परिस्थिती सध्या जिल्ह्यात पहायला मिळत आहे. किमान जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांनी मागणी केल्याप्रमाणे टॅंकर द्या, अशी सूचना ही पालकमंत्री शिवतारेंकडून अद्याप दिली गेली नाही. त्यामुळे पालकमंत्री आहेत कुठे असा प्रश्‍न सर्वांना पडला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख