satara politics | Sarkarnama

"मर्दुमकी असेल तर समोरासमोर या' 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 15 मार्च 2017

जिल्हा बॅंकेत भ्रष्ट कारभार करता यावा म्हणूनच मला कार्यकारिणीतून वगळले. तथापि, संचालक म्हणून आम्ही वेळोवेळी तुमच्या कारभाराचा बुरखा फाडणारच
आहोत. 
- खासदार उदयनराजे भोसले 

सातारा : आमची कथित दहशत, सातबारा, पक्षातील स्थान याबाबत शिवेंद्रसिंहराजेंना अनेक प्रश्‍न आणि कोडी पडली आहेत. तुमच्यात खरंच मर्दुमकी असेल तर
ठिकाण आणि वेळ ठरवा. सगळी उत्तरे समोरासमोर देतो, असे प्रतिआव्हान खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिले आहे. 

उदयनराजेंनी या पत्रकात म्हटले की, ""सातबारा कोरा करण्याचे टुमणे ज्यांनी लावले आहे, तेच यापूर्वी तत्कालीन आमदार विवेक पंडित यांना पुढे करून पडद्याआडून
सूत्रे हलवत होते. अधिवेशन संपल्यावर आम्ही सातबाऱ्याविषयी एक घाव दोन तुकडे करणार आहोत. तथापि, बॅंकेच्या गिळून टाकलेल्या ठेवी व रकमा तुम्ही कधी
देणार, इरिगेशन स्कीम, बॅंक, कारखाना, सूतगिरणी, अजिंक्‍य बझार आदी ठिकाणी गैरव्यवहार केले. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोजा चढला, तो तुम्ही कधी
उतरवून देणार, याची उत्तरे जनतेला द्या. पक्षाने झिडकारले हे शिवेंद्रसिंहराजेंनी सांगण्याची गरजच नाही. तो हक्क केवळ थोरल्या पवारसाहेबांचा आहे. पूर्वीपासूनच
आम्ही कायमच जनता हाच आमचा पक्ष मानतो. ही आमची भूमिका पक्षधुरिणींना मान्य असल्यामुळेच आम्हाला दोन वेळा उमेदवारी देताना चढते मताधिक्‍य
मिळाले. तुमच्या भ्रष्ट कारभारामुळेच जनतेचा तुमच्यावरील विश्‍वास उडत चालला आहे. तालुक्‍यात तुमच्या विरोधात विरोधकांना 16 हजारांचे मताधिक्‍य मिळाले.
यावरून तुमच्या हेकेखोर स्वभावाला जनतेने झिडकारले आहे. खासदारकीच्या आधीही, आम्ही नगरपालिकेचे नगरसेवक होतो. महामंडळाचे उपाध्यक्ष होतो, आमदार
होतो आणि मंत्रीही होतो. त्यामुळे खासदारकीच्या आधीही आमचे राजकीय अस्तित्व होते. परंतु, त्या उलट आमदारकीच्या आधी तुमचे अस्तित्व केवळ आयत्या
पीठावर रेघोट्या मारण्यापुरते होते. आम्ही अंधारात वार करत नाही. समोरून चाल करणारे आहोत, हे ध्यानात घ्या. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख