Satara Political News Ramraje Nimbalker's Selfie with BJP Leader | Sarkarnama

रामराजेंची खंडाळ्यात खलबते; शंकरराव गाढवे, बकाजीराव पाटलांसोबत काढली रामराजेंनी  सेल्फी

अश्पाक पटेल
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज खंडाळा येथील शंकरराव गाढवे व बकाजीराव पाटील या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन राजकीय चाचपणी केली. मागील महिन्यातच ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर बकाजीराव पाटील हे राष्ट्रवादीतील नाराज गटात मोडतात.

खंडाळा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज खंडाळा येथील शंकरराव गाढवे व बकाजीराव पाटील या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन राजकीय चाचपणी केली. मागील महिन्यातच ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर बकाजीराव पाटील हे राष्ट्रवादीतील नाराज गटात मोडतात. परिणामी रामराजेंची या ज्येष्ठ नेत्यासोबत झालेली खलबते त्यांच्या भाजप प्रवेशाची चाचपणी नाही ना, अशी चर्चा आता येथील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या बैठकीत जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बकाजीराव पाटील, माजी सभापती रमेश धायगुडे व सुभाष साळुंखे उपस्थित होते.  बकाजीराव पाटील आणि शंकरराव गाढवे यांचे गट खंडाळ्याच्या  राजकारणात अनेक वर्ष परस्पर विरोधी लढले.  मात्र, आज सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या उपस्थितीत दोन्ही गटप्रमुख एकत्र आले. रामराजेंनी आपल्या गाडीत या दोघांना घेतल्यानंतर त्यांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

मागील काही दिवसांमध्ये वाईचे माजी आमदार मदन  भोसले यांच्या नेतृत्वाखाली शंकरराव गाढवे गटाने भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी शंकरराव गाढवे ( सर)  यांची घेतलेली भेट व राष्ट्रवादीवर अनेक दिवस नाराज असलेले बकाजीराव पाटील यांनाही सोबत घेऊन चर्चा केली. या चर्चेत नेमकी कोणती खलबते झाली हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण भाजप प्रवेश्यापूर्वी रामराजेंची ही चाचपणी तर नाहीना असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

ही  राजकीय चाचपणी करताना खंडाळा पंचायत समितीचे माजी सभापती रमेश दादा धायगुडे यांच्या पुढाकाराने हे नेतृत्व एकत्र आल्याची ही चर्चा आहे. या चर्चेनंतर रामराजेंनी श्रावणानंतर फलटणच्या राजवाड्यावर या दोन्ही नेत्यांना शाही मेजवानीचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे फलटणच्या राजवाड्यावर होणारी मेजवानीला राजकीय महत्त्व आले आहे.  

मागील काळात वाई विधानसभेसाठी सुद्धा रामराजे यांनी चाचपणी केली होती. या चर्चेचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. त्यावर  ऐ तो अभी ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है... अशी पोस्ट फिरु लागल्याने तालुक्यात राजकीय चर्चेला ऊत आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख