satara ncp is relax now | Sarkarnama

उदयनराजे, गोरे अडकल्याने राष्ट्रवादीचा सुस्कारा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

माणचे आमदार जयकुमार गोरे आणि खासदार उदयनराजे भोसले हे दोघे अडचणीत असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता सुस्कारा सोडला आहे.

सातारा : विधान परिषदेच्या निवडणुकीतील अपयशानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी व्यूहरचना करून पक्षाला अडचणीत आणणारे माणचे आमदार जयकुमार गोरे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात मोहीम उघडली. त्यातून हे दोघे अडचणीत असल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आता सुस्कारा सोडला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय होईल इतकी मते असूनही केवळ पक्षातील काहींनी विरोधात काम केले. यामध्ये खासदार उदयनराजे भोसलेंचा ही समावेश होता. या सर्व प्रक्रियेत माणचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. निवडणुकीत माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांचा अश्‍चर्यकारकपणे विजय झाला. राष्ट्रवादीच्या नेत्यांना विधान परिषद निवडणुकीतील हा पराभव अगदी जिव्हारी लागला होता. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीपासून जिल्ह्यातील नेत्यांनी आमदार गोरे व खासदार उदयनराजेंविरोधात व्यूहरचना आखून हे दोघे निवडणूक प्रक्रियेपासून बाजूला कसे राहतील, याची खबरदारी घेतली.

याच दरम्यान, आमदार गोरे विनयभंगाच्या प्रकरणात अडकले. तर खासदारांना बाजूला ठेवून निवडणूक लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी घेतला. यामुळे खासदारांनी राजधानी जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीविरोधात बंड करण्याचा निर्णय घेतला. पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत. प्रत्येक पक्ष जिल्हा परिषद निवडणुकीत स्वतंत्र लढला. त्यामुळे राष्ट्रवादी विरोधात सर्व विरोधक एकवटू शकले नाहीत. परिणामी उदयनराजेंना सातारा तालुक्‍यात नीटसे उमेदवार मिळविता आले नाहीत. उदयनराजे सातारा तालुक्‍यातच अडकून पडले तर गोरे न्यायालयीन प्रक्रियेत अडकले. या दोघांच्या गैरहजेरीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी डाव साधत पुन्हा एकदा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपले वर्चस्व राखले. राष्ट्रवादीच्या कोणत्याच कार्यक्रमात उदयनराजेंचे नावही नसते. त्यांना पूर्णपणे बाजूला ठेवले गेले आहे.

आता तर ते खंडाळा येथील सोना अलॉईज कंपनीच्या मालकांना खंडणी मागितल्या प्रकरणात अडकले आहेत. त्यांना अटक पूर्व जामीन मिळविताना नाकी नऊ आले आहे. राष्ट्रवादीला त्रासदायक ठरणारे खासदारांच्या मागे ससेमिरा लागल्याने पक्षातील नेत्यांना त्यांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्याचा त्रास कमी झाला आहे. त्यामुळे आमदार गोरे आणि खासदार उदयनराजेंच्या त्रासापासून राष्ट्रवादीला सध्यातरी मुक्ती मिळाल्याचे चित्र आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख