satara guardian minister | Sarkarnama

भुछत्राप्रमाणे उगवणाऱ्या पालकमंत्री शिवतारेंवर सेना कार्यकर्तेच नाराज

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 एप्रिल 2017

पालकमंत्र्यांबाबत शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. याची दखल मात्र, मातोश्रीवरील कोणीही पदाधिकारी घेत नाही, अशी खंत ही पक्षाचे पदाधिकारी व्यक्त करत आहेत.

सातारा : शिवसेनेचे पालकमंत्री असूनही जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांना ते विचारत घेत नसल्याने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे. भुछत्राप्रमाणे बैठकीपुरते येणारे पालकमंत्री पदाधिकाऱ्यांना साधे "बैठकीला या' असेही सांगण्याचे कष्ट घेत नसल्याने सध्या शिवसेनेत पालकमंत्री विरुद्ध कार्यकर्ते असा वाद रंगला आहे.

सातारा जिल्ह्यात सत्ता राष्ट्रवादीची आणि पालकमंत्री शिवसेनेचे आहेत. त्यामुळे पहिल्यापासून राष्ट्रवादीचे नेते पालकमंत्र्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतात तर या सर्व विरोधकांना व्यवस्थितपणे हाताळून काम मार्गी लावण्याची भूमिका श्री. शिवतारे बजावत आहेत. पण पहिल्यापासूनच त्यांनी जिल्ह्याशी संपर्क कमी ठेवला आहे. एखादी घटना, यात्रा, कार्यक्रम व महत्त्वाची बैठक असेल तरच शिवतारे जिल्ह्यात येतात. या दौऱ्यात त्यांच्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते फारसे दिसत नाहीत. शिवसेनेचे पालकमंत्री झाल्यावर जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. शिवसेनेला पुन्हा भरारी मिळून कार्यकर्त्यांना कोणत्या ना कोणत्या माध्यमातून संधी मिळेल, अशी आशा होती. पण शिवतारेंनी जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना फारसे अंगाला लावून घेतले नाही.

नुकतीच जिल्ह्याची टंचाई आढावा बैठक पालकमंत्री शिवतारेंच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस शेतकरी संघटनेसह इतर सर्वच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते. पण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या बैठकीसंदर्भात पालकमंत्र्यांशी संपर्क साधून विचारणा केली. पण बैठकीला या असेही पालकमंत्री म्हणाले नाहीत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख