satara dpc | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या सदस्यांना नियोजन समितीचे वेध

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 मार्च 2017

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवीन सदस्यांचे लक्ष जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या नियोजनात सहभागी होता यावे यासाठी जिल्हा परिषदेचे नवे सदस्य या निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत.

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नवीन सदस्यांचे लक्ष जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या नियोजनात सहभागी होता यावे यासाठी जिल्हा परिषदेचे नवे सदस्य या निवडणुकीच्या प्रतीक्षेत आहेत. साधारण मे महिन्यात राज्यातील सर्व नियोजन समितींची निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. त्यापूर्वीच निवडणूक घेण्याची मागणी काही जिल्हा परिषद सदस्य करू लागले आहेत.

जिल्हा नियोजन समितीत निवडून आलेले 32 सदस्य असून आठ सदस्य नियुक्त आहेत. सध्या नियोजन समितीत राष्ट्रवादीचे 22 सदस्य आहेत. पालिका निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक होऊन नवीन सदस्य सभागृहात आले आहेत. त्यामुळे नियोजन समितीच्या जुन्या सदस्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे समितीत आता निमंत्रित सदस्य म्हणजेच आमदार, खासदार व नियुक्त सदस्यच उरले आहेत. नव्याने निवडून आलेल्या जिल्हा परिषद व नगरपालिका सदस्यांतून नियोजन समितीवर पुन्हा 32 सदस्य निवडले जाणार आहेत. या निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. त्यामुळे या सदस्यांतूनच पुन्हा नियोजन समितीवर सदस्य निवडले जातील. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीतील यशानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांचे लक्ष नियोजन समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे. नियोजन समितीवर वर्णी लागण्यासाठी सदस्य प्रयत्नशील आहेत. समितीच्या जुन्या सदस्यांची मुदत संपल्याने आता नव्याने सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम लवकर जाहीर करावा, अशी मागणी नवीन सदस्यांकडून होऊ लागली आहे. साधारण मे महिन्यात नियोजन समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल, जूनमध्ये निवडणुका होण्याची शक्‍यता आहे. राज्यातील सर्वच नियोजन समितीतील सदस्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे या सदस्यांच्या जागी नव्या सदस्यांची निवड होण्यासाठी स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम एकाच वेळी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेत्यांनी आता नियोजन समितीवर कोणाला पाठवायचे याची चाचपणी सुरू केली आहे.

नियोजन समितीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोण सदस्य पाठविले जाणार याचा निर्णय विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर असेल. ते इतर आमदारांशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख