Satara District Bandh From Tomorrow | Sarkarnama

सातारा जिल्हा उद्यापासून बंद :  "करो या मरो' ची भूमिका घ्यावी साताऱ्यातील युवकांची मागणी

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 24 जुलै 2018

राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलने होत असताना राजधानी शांत बसता कामा नये, यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याची मागणी त्यांनी केली. युवकांच्या भावनांची दखल घेत ठोस आंदोलन छेडण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी उद्या (बुधवार) राजवाड्यापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सातारा : मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई सुरू करण्यासाठी उद्यापासून (बुधवारी) सातारा जिल्हा बंद ठेवण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या आज (मंगळवार) झालेल्या समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे. 

मराठा आरक्षणासाठी औरंगाबाद येथे गोदावरी नदीच्या पात्रात काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतली. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर सकल मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीची औरंगाबाद येथे बैठक झाली. त्यामध्ये राज्य बंदची हाक देण्यात आली. दरम्यान, पश्‍चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरला गेले आहेत. त्यांच्या परतीचा दिवस असल्याने सातारा जिल्ह्यात आज बंद पुकारण्यात आला नाही. 

बुधवारच्या बंदचे नियोजन करण्यासाठी आज येथील कल्याण रिसॉर्टमध्ये जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी युवक व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी युवकांनी आक्रमकपणे भूमिका मांडल्या. 'शासनाने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मुंबई मोर्चावेळी देण्यात आलेल्या एकाही घोषणेची पूर्तता करण्यात आलेली नाही. ओबीसी समाजाप्रमाणे कोणत्याच सवलती मिळत नाही. 50 टक्के शुल्क भरून प्रवेश मिळत नाही, अण्णासाहेब पाटील महामंडळातून कर्ज मिळत नाही. त्यातच मेगा भरतीचा घाट घातला आहे. आरक्षणाचा प्रश्‍न सोडवण्याचे सोडून समाजाची फसवणूक करण्याचे काम होत आहे.' असे सांगत 'करो या मरो'ची भूमिका घेण्याची मागणी युवकांकडून करण्यात आली. 

राज्यभर मोठ्या प्रमाणात आंदोलने होत असताना राजधानी शांत बसता कामा नये, यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याची मागणी त्यांनी केली. युवकांच्या भावनांची दखल घेत ठोस आंदोलन छेडण्याचा निर्णय समन्वय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी उद्या (बुधवार) राजवाड्यापासून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तेथून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. त्याठिकाणी ठिय्या आंदोलनाला सुरवात करण्यात येणार आहे. 

रक्षणाचा निर्णय होऊपर्यंत आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्याची मागणी या वेळी युवक व महिलांनी केली. सकाळी नऊपूर्वी जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरपंचापासून खासदारापर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी या मोर्चाला उपस्थित राहावे. अन्यथा मते मागायला समाजाकडे यायचे नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला, तसेच आंदोलनाला उपस्थित न राहणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या गाड्या फोडण्याची मोहीम हातात घेणार असल्याचा इशारा या वेळी युवकांनी दिला. जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

सरकारनामा अॅप डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख