सातारा : पृथ्वीराज चव्हाणांच्या मौनामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता 

Prithviraj-Chavan
Prithviraj-Chavan

सातारा  : ब्लॉक पदाधिकारी निवडीत विद्यमान जिल्हाध्यक्ष व कार्याध्यक्ष  यांचा हस्तक्षेप वाढल्याने कॉंग्रेसमधील आमदार आनंदराव पाटील (नाना) गट विरूध्द आमदार जयकुमार गोरे (भाऊ) गट असे व्दंद्व निर्माण झाले आहे. 

काल कोरेगावात या प्रकारातूनच पक्षनिरिक्षकांसमोरच धक्काबुक्कीचा प्रकार झाला. जिल्ह्यात कॉंग्रेसचे अस्तित्व दिवसेंदिवस कमी होत असताना दोन नेते व त्यांच्या समर्थकांतील हा वाद विकोपाला गेल्यास कॉंग्रेसचे भवितव्य अडचणीत येण्याची शक्‍यता आहे. 

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष निवडीवरून विद्यमान जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्यात कलगीतुरा सुरू झाला आहे. या दोघांच्या वादाकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दूर्लक्ष करीत नवीन अध्याय मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते यशस्वी झालेले नाहीत. 

सध्या कॉंग्रेस अंतर्गत ब्लॉक कमिटीच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेसाठी प्रत्येक तालुक्‍याला स्वतंत्र निवडणुक निर्णय अधिकारी नेमण्यात आला आहे. या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली बैठका होऊन त्यामध्ये इच्छुकांची नावे अंतिम केली जात आहे. 

मुळात या बैठकांना विद्यमान जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व कार्याध्यक्ष ऍड. विजयराव कणसे हे उपस्थित राहून हस्तक्षेप करत आहेत. तसेच ते त्यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांचीच नावे पदाधिकारी म्हणून निवडणुक निरिक्षकांना सूचवत असल्याबद्दल आमदार जयकुमार गोरे यांनी आक्षेप नोंदविला आहे.

 यासंदर्भात पक्ष निरिक्षक तौफिक अहमद यांच्यापर्यंत अनेकांनी तक्रारीही नोंदविल्या. पण त्यांनीही फारसे लक्ष न दिल्याने आता कॉंग्रेसमध्ये ब्लॉक कमिटीच्या निवडीवरून आमदार गोरे गट व आमदार आनंदराव पाटील गट यांच्यात वादाची ढिणगी पडली आहे. या ढिणगीला काल कोरेगावातून सुरवात झाली.

 कोरेगावात निवडणुक निरिक्षकांच्या उपस्थित बैठक सुरू होताना केवळ आनंदराव पाटील व ऍड. विजयराव कणसे यांच्याच समर्थकांना निमंत्रण होते. जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील, तालुकाध्यक्ष किशोर बाचल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, माजी युवक अध्यक्ष मनोहर बर्गे या आमदार गोरे समर्थकांना या बैठकीची खबरच मिळाली नाही.

 पण बैठक सुरू असल्याचे समजल्यावरून ही सर्व मंडळी त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी आम्हाला बैठकीला का बोलावले नाही, अशी विचारणा केली. त्यावर निवडणुक निरिक्षकांनी सर्वांना का बोलावले नाही, अशी विचारणा नानांना केली. त्यावर सर्वांना निमंत्रण होते, असे सांगितले. 

त्यावेळी निवडणुक निरिक्षकांचा सत्कार करण्यासाठी गोरे समर्थक पुढे आले. त्यावेळी ऍड. विजयराव कणसेही प्रथम आम्ही सत्कार करणार म्हणून पुढे गेले. या सत्कारावरून निवडणुक निरिक्षकासमोरच तालुकाध्यक्ष किशोर बाचल व भिमराव पाटील यांच्यात धक्कबुक्कीचा प्रकार झाला. यानंतर निरिक्षकाने हा वाद मिटविता घेत शेवटी कोरेगाव तालुक्‍यातील पदाधिकारी ठरविण्याचा सर्वाधिकार पृथ्वीराज चव्हाण यांना देण्याचा ठराव केला. 

पण मुळात पृथ्वीराज चव्हाण यांना आमदार गोरे व आमदार आनंदराव पाटील या दोघांकडेही दूर्लक्ष करण्याची भुमिका घेतली आहे. तसेच ते कॉंग्रेस अंतर्गत निवडीकडे फारसे लक्ष देत नाहीत. त्यामुळे कॉंग्रेसमधील दोन आमदारांचा हा वाद मिटविणार कोण, हा प्रश्‍न आहे. हे आमदारांचे दोन गट प्रत्येक कार्यक्रमात असे एकमेकांना भिडू लागले तर पदाधिकारी निवडी बाजूला पडून कॉंग्रेस आहेही स्थिती आणखी बिघडणार आहे. आता पृथ्वीराज चव्हाण यावर काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com