satara congress | Sarkarnama

कॉंग्रेसजन नेतृत्व बदलाच्या प्रतीक्षेत 

सरकारनामा न्यूजब्युरो 
बुधवार, 8 मार्च 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने कॉंग्रेसजनांना नेतृत्वबदलाची अपेक्षा आहे. हा विषय काही
कॉंग्रेसजनांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कानावर घातला आहे. 

सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कॉंग्रेसची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने कॉंग्रेसजनांना नेतृत्वबदलाची अपेक्षा आहे. हा विषय काही
कॉंग्रेसजनांनी थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कानावर घातला आहे. 

सातारा जिल्हा पूर्वी कॉंग्रेसचा बालेकिल्ला, पण राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर हा बालेकिल्ला राष्ट्रवादीने हिसकावून घेतला. गेल्या दहा वर्षात कॉंग्रेसची जिल्ह्यातील ताकद लयाला गेल्याचे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत स्पष्ट झाले. कॉंग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या. निवडणुकीत मानहानी वाचविण्यासाठी अखेरच्या क्षणी त्यांनी
राष्ट्रवादीशी हात मिळवणी करूनही हातात काहीही पडले नाही. 

सध्या जिल्ह्यातील कॉंग्रेसची विविध शकले झाली आहेत. कऱ्हाडातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील कॉंग्रेसची सूत्रे
हलवितात. पण त्यांचे नेतृत्व अनेकांना मान्य नाही. कॉंग्रेसचा प्रत्येक तालुक्‍यात मजबूत गट असला तरी या गटांत एकीचा अभाव आहे.

वाईत माजी आमदार मदन
भोसले, कोरेगावात ऍड. विजयराव कणसे, भीमराव पाटील, किरण बर्गे, माण तालुक्‍यात आमदार जयकुमार गोरे, खटावमध्ये अशोक गोडसे, सुरेश जाधव, धैर्यशील
कदम तर फलटणमध्ये हिंदूराव नाईक निंबाळकर, रणजितसिंह निंबाळकर, प्रल्हाद साळुंखे-पाटील, पाटणमध्ये हिंदूराव पाटील तर साताऱ्यात रजनी पवार, बाबासाहेब
कदम, धनश्री महाडीक, रवींद्र झुटींग असे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तालुकानिहाय जाळे आहे. पण यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणांनी मतभेद आहेत. यातूनच
कॉंग्रेसची ताकद दिवसेंदिवस क्षीण होत चालली आहे. याचा फटका नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत बसला आहे.

या पडझडीतून पक्षाला सावरून पुन्हा पक्षाची नव्याने बांधणी करण्याची जबाबदारी सर्व तालुक्‍यातील प्रमुख नेत्यांवर आली आहे. पण या सर्वांना नेतृत्व बदलाचे वेध लागले आहेत. तेच तेच पदाधिकारी नको आता जुन्या नव्यांचा संगम करत पक्षश्रेष्ठींनी नेतृत्व बदल करावा आणि जिल्ह्यातील कॉंग्रेसला पुन्हा उभारी मिळवून देणाऱ्या नेतृत्वाच्या ताब्यात सर्व सूत्रे द्यावीत, अशी अपेक्षा कॉंग्रेसजन व्यक्त करत आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यावर कॉंग्रेस पक्षश्रेंष्टीकडून सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसजनांची मागणीची पूर्तता होईल, अशी अपेक्षा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख