साताऱ्यात 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी  - satara collector issued new lock down order  | Politics Marathi News - Sarkarnama

साताऱ्यात 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 मार्च 2020

सातारा जिल्ह्यात 20 मार्चपासून आजपर्यंत एकही नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळलेला ना

सातारा : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने एक ते 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्‍यक सेवा वगळता उर्वरित सर्व बंद राहणार आहे. या लॉकडाऊनची कडक पध्दतीने अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे.

सातारा जिल्ह्यात 20 मार्चपासून आजपर्यंत एकही नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळलेला नाही. मार्चमध्ये परदेशातून आलेले दोन कोरोना बाधित रूग्ण सापडले होते. त्यांच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत परदेशातून प्रवास करून आलेल्या 53 जणांना ताप, खोकला आणि कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळल्याने त्यांच्यावर जिल्हा शासकिय रूग्णालयात तपासणीसाठी दाखल केले होते. त्यापैकी जिल्हा रूग्णालयात 45 तर कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्य आठ जणांना ठेवण्यात आले होते. त्यापैकी 53 जणांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पुण्याला पाठविले होते. त्यापैकी दोन जणांचे अहवाल कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. तर 45 जणांना कोरोना संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा जणांचा अहवाल अद्याप येणे बाकी असून यापैकी 45 जणांना रूग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. सध्या केवळ आठजण रूग्णालयात आहेत. सध्या परदेशातून आलेले 504 प्रवाशी होम क्वारंन्टाइनमध्ये असून यापैकी 14 दिवस पूर्ण झालेल्यांची संख्या 320 आहे. अद्याप 184 जणांवर आरोग्य विभाग लक्ष ठेऊन असून यापैकी 181 जणांना विविध संस्थांमध्ये अलगीकरण केलेले आहे.

दरम्यान, आज परदेशातून आलेल्या साताऱ्यातील चार व कऱ्हाड येथील पाच संशयित रूग्णांना जिल्हा रूग्णालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये इस्लामपूर येथील बाधितांच्या संपर्कात आलेले दोन तसेच परदेशातून प्रवास करून आलेले दोन रूग्णांचा समावेश आहे. कऱ्हाडातील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे विलगीकरण कक्षात पाच जणांना दाखल करण्यात आले आहे. या सर्व संशयित रूग्णाचे घशातील स्त्राव पुणे येथील एनआयव्ही संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अमोद गडीकर यांनी दिली आहे. काल (सोमवारी) साताऱ्यातील जिल्हा रूग्णालय व कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या एकुण अकरा संशयित रूग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, कोरोनाचे संशयित रूग्ण वाढत असल्याने या विषाणूंचा फैलाव वाढून सार्वजनिक आरोग्य धोक्‍यात येऊ नये, यासाठी जिल्ह्यात एक ते 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी लागू केले आहेत. यानुसार जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी एका वेळेस पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना जमा होण्यास मनाई करण्यात आली आहे. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांनी संपूर्ण जिल्ह्यात सण, यात्रा व उत्सवाचे अनुषंगाने दोन ते 14 एप्रिलच्या रात्री दहा वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश लागू केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख